काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियातील जंगलात वणव्यामुळे लागलेल्या आगीने थैमान घातलं होतं. या आगीत ऑस्ट्रेलियाच्या वन-संपदेचं मोठं नुकसान झालं. हजारो प्राण्यांना या आगीत आपला जीव गमवावा लागला, तर अनेक मुकी जनावरं जखमीही झाली. जगभरातून यादरम्यान ऑस्ट्रेलियात मदतकार्य पोहचत होतं. अशातच भारतात हॉकीचा कारभार पाहणाऱ्या हॉकी इंडियाने स्तुत्य पाऊल उचललं आहे. वणव्यातील पीडितांना हॉकी इंडियाने २५ हजार अमेरिकन डॉलर (अंदाजे १८ लाखांच्या घरात) ची मदत केली आहे.

हॉकी ऑस्ट्रेलियानेही भारताकडून आलेल्या या मदतीबद्दल, हॉकी इंडियाचे अध्यक्ष मोहम्मद मुश्ताक अहमद यांचे आभार मानले आहेत. कठीण प्रसंगात आमच्या सहकाऱ्यांनी आम्हाला केलेली मदत आम्ही नेहमी लक्षात ठेऊ, हॉकी इंडियाचे या मदतीसाठी मनापासून आभार, अशा शब्दांत हॉकी ऑस्ट्रेलियाच्या अध्यक्षा मेलेनी वुसनम यांनी भारताचे आभार मानले आहेत.

वणव्यात झालेलं नुकसान आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात ज्यांनी आपला प्राण गमावला, त्यांच्यासाठी ऑस्ट्रेलियात एका लिलावाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जगभरातील विख्यात व्यक्ती आपापल्या वस्तु या लिलावात ठेवणार आहेत. हॉकी इंडियाने आपल्या संघाचे कर्णधार मनप्रीत सिंह आणि राणी रामपाल यांची सही असलेली जर्सी लिलावाकरता दिली आहे. या वणव्यात ऑस्ट्रेलियातली ४६ लाखांपेक्षा अधिक झाडं जळून खाक झाली, काही इमारतींनाही या आगीची झळ बसली…ज्यात ३० जणांना आपले प्राण गमवावे लागले होते.