News Flash

हॉकी लीगची कबड्डीकडून पकड

प्रो कबड्डी आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धा यांमध्ये हॉकी इंडिया लीग दबून गेली.

हॉकी लीगची कबड्डीकडून पकड

प्रो कबड्डी आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धा यांमध्ये हॉकी इंडिया लीग दबून गेली. खरं तर अशी कोणती लीग सुरू होती हे अनेकांच्या गावीही नाही. यामागची कारणं शोधणं गरजेचं आहे.

हॉकी इंडिया लीगच्या (कोल इंडिया हॉकी इंडिया लीग, प्रायोजकांमुळे नामकरण) २०१६ च्या हंगामाच्या जेतेपदाचा माज जयपी पंजाब वॉरियर्स संघाने पटकावला. आश्चर्य वाटलं ना? ही स्पर्धा सुरू कधी झाली आणि संपली कधी, कुणालाच काही कळले नाही. भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, त्यानंतर मायदेशात झालेली श्रीलंकेविरुद्धची मालिका आणि त्यात प्रो कबड्डी लीगच्या तिसऱ्या पर्वातील पहिला टप्पा यामुळे हॉकी इंडिया लीग सुरू आहे काय आणि नाही काय, कुणालाच काही माहीत नव्हते. अगदी जेतेपदावर शिक्कामोर्तब होईपर्यंत तरी सामान्य क्रीडारसिक अनभिज्ञ होते. पंजाब वॉरियर्स जिंकले, या बातम्यांवर अनेकांसमोर हेच प्रश्न होते की ही लीग सुरू होती? कधी सुरू झाली आणि संपली कधी?

जागतिक स्तरावरील नामचीन खेळाडूंसह भारताच्या अव्वल खेळाडूंचा समावेश असलेल्या या लीगबाबत अनेकांच्या मनात असे प्रश्न निर्माण होणे सहाजिक होते. गतवर्ष अखेरीस प्रो कुस्ती लीग आणि या वर्षांच्या सुरुवातीला झालेली प्रीमिअर बॅडमिंटन लीग पार पडल्या, त्यांचीही अवस्था फार चांगली नव्हती. लोकप्रियतेच्या बाबतीत त्यांनाही क्रिकेटवेडय़ा अजगराने गिळून टाकलं. पण हे मान्य करण्याचं धाडस आयोजकांनी केलं तर खरं.. आपल्या लीगला कसा भरघोस प्रतिसाद मिळाला याचा फुगीव आकडा दाखवण्यात ते मश्गूल झाले. ‘हा आहे पुरावा, आता बोला आम्ही कुठे कमी पडलो’, असा दावाच त्यांच्याकडून होऊ लागल्याने सर्वाना तो मान्य करावा लागला. शेवटी आपल्या कायद्यानुसार पुरावाच खरा असतो.. दोन दिवसांपूर्वी हॉकी इंडिया लीगची सांगता झाली. आता तेही चलनी फुगवटय़ासारखा आकडा सादर करतील अणि स्वत:ची पाठ थोपटून घेतील. पण हा आकडा म्हणजे ‘लोकप्रियता’ का? तर याचे उत्तरदेखील ते ‘हो’ असंच देतील. कारण, ते व्यवहारी आहेत आणि व्यवहारज्ञान हेच शिकवतो. आपण किती माल विकला हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे. त्या मालाचा पुढे कसा आणि किती विनियोग झाला किंवा झालाही नाही, याच्याशी त्यांना काही नसते. हॉकीच्या बाबतीतही तसेच झाले. ‘प्रो लीग’च्या मायाजाळात त्यांनी उडी घेऊन चार वष्रे झाली. त्याआधी वर्ल्ड सीरिज हॉकी दोन वष्रे चालली. ते प्रतिस्पर्धी किंबहुना शत्रूच्या गटातील बाळ असल्याने हॉकी इंडियाने त्याला लाथाडले. इथवरच नाही, तर त्याचं अस्तित्व संपवून हॉकी इंडिया लीग हे नवीन बाळ जन्माला घातलं. या बाळाचं स्वागतही जंगी झालं. हॉकी इंडियाला या लीगमधील पैशांचा पाऊस पडेल अशी स्वप्नं पडू लागली. मात्र, हलक्या सरींवरच त्यांना तृप्त व्हावं लागलं. या अतृप्त आत्म्यांनी दरवर्षी लीगचा दणक्यात वाढदिवस साजरा करण्यासाठी आणि गर्दी गोळा करण्यासाठी सेलेब्रिटी बोलावले. त्यात बॉलीवूडपासून ते क्रिकेटमधील दिग्गजांचा समावेश होता. त्यामुळे गर्दी जमली. पण ती क्षणिक होती.

२०१५ हे वर्ष तसे भारतीय हॉकी क्षेत्रासाठी सुगीचे होते. वरिष्ठ, कनिष्ठ पुरुष व महिला संघांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये चांगली कामगिरी केली होती. आता ही लीग पुरुषांची असल्यामुळे केवळ पुरुषांच्या कामगिरीवर नजर टाकू या. आशिया चषक, जागतिक हॉकी लीग, सुलतान जोहोर चषक यामध्ये पुरुष संघाने ठसा उमटवला. सरदार सिंगच्या नेतृत्वाखाली आकाशदीप, युवराज वाल्मिकी, देवींदर वाल्मिकी, बिरेंद्र लाक्रा, रुपिंदर पाल सिंग, मनप्रित सिंग आणि आर. श्रीजेश यांनी बहारदार खेळ केला. कनिष्ठ गटात हरमनप्रीत सिंगला श्रेय देणे गरजेचे आहे. त्याने सुलतान जोहोर, आशिया चषक स्पध्रेत जणू गोलची आतषबाजी केली. ही सर्व दिग्गज मंडळी हॉकी लीगमध्ये खेळली. तरीही हवा तसा प्रतिसाद लीगला मिळाला नाही. हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरिंदर बात्रा हे तर घोटीव व्यापारी. ‘चांगली कामगिरी कराल, तर आणि तरच प्रायोजक मिळतील. नाहीतर हॉकीचे भविष्य अधांरी’, असा सज्जड दमवजा इशाराच त्यांनी खेळाडूंना दिल्याच्या चर्चा मध्यंतरी रंगल्या होत्या. याच कारणामुळे पॉल व्ॉन अ‍ॅस यांच्याशी त्यांचे फिस्कटले. या चर्चामध्ये तथ्य असेल तर हॉकीपटूंच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे भांडवल करून हॉकी लीगला सुगीचे दिवस मिळवून देणे त्यांना सहज शक्य होते. तसे झाले नाही. हॉकी लीगची लोकप्रियता कमी झाली, यामागचे कारण शोधणे गरजेचे आहे.

वर्ल्ड सीरिज हॉकीचे अस्तिव संपवून उदयास आलेली हॉकी इंडिया लीगला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही; किंबहुना तो कमवताच आला नाही. भारतीय हॉकी महासंघ आणि हॉकी इंडिया यांच्यातील वादामुळे हा ऱ्हास झाला. वर्ल्ड सीरिज हॉकीवर हॉकी इंडिया लीगने कुरघोडी केली, परंतु लीगचा पसारा वाढण्याऐवजी घटला. आठऐवजी सहाच संघ या लीगमध्ये खेळत आहेत. इथे संघ घटल्यामुळे हॉकीची लोकप्रियता कमी झाली असे सूचित करणे चुकीचे ठरेल. बात्रा यांच्या चाणाक्ष्य बुद्धीला हॉकीचं मार्केटिंग करता आलं नाही. विशेषत: भारतीय संघ सर्व आघाडय़ांवर उल्लेखनीय कामगिरी करत असताना. ऑलिम्पिक अवघ्या काही महिन्यांवर शिल्लक असताना हॉकीचं मार्केटिंग करण्यात कसर राहून गेली. हे झाले या वर्षीचे. यापूर्वी तीन हंगामात लोकप्रियतेचा आकडा कमी अधिक प्रमाणात सारखाच होता. त्याची कारणे काय? तर बात्रांची हुकूमशाही.

गेल्या काही वर्षांत हॉकी इंडियाने घेतलेल्या चुकीच्या निर्णयांचा फटका खेळाला आणि खेळाडूंना बसला. बक्कळ रक्कम देऊन परदेशी प्रशिक्षकाची नेमणूक करायची आणि काही काळातच त्यांची हकालपट्टी करायची. हे सत्र सुरूच राहिले अगदी रिओ ऑलिम्पिक एका वर्षांवर येऊन ठेपले तोपर्यंत. या सततच्या भांडणामुळे हॉकीचा चाहतावर्गही रोडावला. काही राज्यांपर्यंतच हॉकी मर्यादित होऊन बसली. त्यांचा गाढा वाढण्याऐवजी तो दिवसेंदिवस कमी झाला आणि म्हणून हॉकी इंडियामध्ये आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय दिग्गज खेळूनही त्याला हवी तशी लोकप्रियता मिळाली नाही. दुसरे आणि मुख्य कारण म्हणजे प्रो कबड्डी. नुकत्याच जन्मलेल्या या बाळाने अगदी अल्पावधीत प्रेक्षकांना आपलेसे केले. मराठमोळ्या मातीतील खेळ हा खऱ्या अर्थाने ग्लोबल झाला. त्यामुळे यातून अधिक पैसा मिळेल याची शास्वती असल्यामुळे प्रायोजक आणि आयोजकांनी वर्षांतून दोन टप्प्यांत ही लीग खेळविण्याचा निर्णय घेतला. याचा सर्वाधिक फटका बसला तो हॉकीलाच.

१८ जानेवारीला सुरू झालेल्या हॉकी लीगच्या यंदाच्या प्रवासात प्रो कबड्डीने उत्तम चढाई केली. प्रेक्षकांची मागणी आणि टीआरपी पाहता स्टार स्पोर्ट्सनेही प्राइम टाइममध्ये कबड्डीचे प्रक्षेपण करण्यावर प्राधान्य दिले आणि त्यामुळे हॉकी लीगला आपल्या वेळेत बदल करावे लागले. त्यामुळे ही लीग सुरू कधी होत होती आणि कधी संपत होती हे लोकांना कळलेच नाही. त्यातही स्पर्धेत राहण्यासाठी हॉकी लीगकडून प्रयत्न झालेच नाहीत असे म्हणणे चुकीचे ठरेल. परंतु स्पध्रेअंती कबड्डीने हॉकीची पकड केली, असे म्हणावेच लागेल.
स्वदेश घाणेकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2016 1:19 am

Web Title: hockey india league
टॅग : Hockey,Indian Hockey,Krida
Next Stories
1 पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात प्रतिष्ठेची लढाई
2 श्रीकांत, कश्यप उपउपांत्यपूर्व फेरीत
3 सामना धरमशालेतच; ठाकूर यांना आशा
Just Now!
X