खराब कामगिरीमुळे भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदावरून उचलबांगडी

नवी दिल्ली : हरेंद्र सिंग यांची बुधवारी भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करण्यात आली. २०१८ मधील खराब कामगिरीमुळे हरेंद्र सिंग यांची भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांना आता राष्ट्रीय हॉकी महासंघाने कनिष्ठ संघाचे प्रशिक्षकपद भूषविण्याचा प्रस्ताव दिला आहे.

भारतीय हॉकीमध्ये प्रशिक्षक बदलाचे वारे गेल्या कित्येक वर्षांपासून वाहत असून मे महिन्यात नियुक्ती करण्यात आलेले हरेंद्र सिंग हे त्याच प्रकरणाचा आणखी एक अध्याय ठरले. ‘‘२०१८ हे वर्ष भारतीय हॉकी संघासाठी निराशाजनक ठरले. अपेक्षेप्रमाणे निकाल देण्यात हरेंद्र सिंग अपयसी ठरले. त्यामुळेच हॉकी इंडियाने आता कनिष्ठ खेळाडूंच्या उभारणीसाठी नव्या कार्यक्रमाची आखणी केली आहे,’’ असे कारण हॉकी इंडियाने हरेंद्र सिंग यांच्या हकालपट्टीनंतर दिले आहे.

भारताच्या कनिष्ठ संघाला जगज्जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या हरेंद्र सिंग यांनी भारताच्या वरिष्ठ संघाची सूत्रे हाती घेतली. पण राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला पदकाविनाच मायदेशी परतावे लागले. त्यानंतरही ते संघाचे नशीब पालटू शकले नाहीत. आशियाई स्पर्धेत सुमार कामगिरी करताना भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याचबरोबर भुवनेश्वर येथे झालेल्या जागतिक हॉकी स्पर्धेत भारताचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले.

‘‘हॉकी इंडिया आता भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी नव्याने अर्ज मागवणार आहे. त्यासाठी लवकरच जाहिरात दिली जाणार आहे. मुख्य प्रशिक्षकाच्या गैरहजेरीत उच्च कामगिरी संचालक डेव्हिड जॉन हे संघाची सूत्रे सांभाळतील,’’ असेही हॉकी इंडियाच्या पत्रकात म्हटले आहे. सुल्तान अझलन शाह हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघाचे शिबीर फेब्रुवारी महिन्यात होणार आहे.

२०२० आणि २०२५ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताची युवा फळी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने हरेंद्र सिंग यांच्याकडे कनिष्ठ संघाचे प्रशिक्षकपद देण्याचा निर्णय सोमवारी हॉकी इंडियाची उच्चा कामगिरी आणि सुधार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला समितीचे अध्यक्ष आर. पी. सिंग तसेच माजी ऑलिम्पियन हरबिंदर सिंग, बी. पी. गोविंदा तसेच सय्यद अली उपस्थित होते.

हॉकी इंडियाच्या या निर्णयावर भारताचे माजी कर्णधार झफर इक्बाल यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, ‘‘हॉकी इंडियाची ही वृत्ती पूर्णपणे अव्यावसायिक आहे. ऑलिम्पिक स्पर्धेला दोन वर्षे शिल्लक असताना प्रशिक्षक बदलण्याची घोडचूक भारताने केली आहे. वारंवार प्रशिक्षक बदलण्याच्या वृत्तीमुळे तुम्ही भारतीय संघाकडून चांगली कामगिरी अपेक्षित धरू शकत नाही. जर्मनीलाही उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागले, पण आपली कामगिरी वाईट होते, असे त्यांनी म्हटले नाही.’’