मायकेल नॉब्स यांच्या प्रशिक्षकपदाखाली भारताने ऑलिम्पिकमध्ये कामगिरी सुधारण्याचे आणि हॉकीला पुन्हा झळाळी देण्याचे स्वप्न पाहिले.. ते अधुरे राहिल्याची जाणीव होताच भारताने नॉब्स यांची मुख्य प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी केली आहे. पाच वर्षांचा करार पूर्ण होण्याआधीच मायकेल नॉब्स यांचा ‘डाव’ अध्र्यावरती मोडला आहे.
कराराचा कालावधी पूर्ण होण्याआधीच बाहेरचा रस्ता दाखवले जाणारे नॉब्स हे भारतीय हॉकी संघाचे चौथे परदेशी प्रशिक्षक ठरले आहेत. तीन वर्षे शिल्लक राहिली असतानाच, अकार्यक्षम असा ठपका ठेवत नॉब्स यांचा करार मोडीत काढण्यात आला आहे. नव्या प्रशिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत भारतीय संघाचे उच्च कामगिरी व्यवस्थापक रोएलन्ट ओल्टमन्स यांच्याकडे प्रशिक्षकपदाचा भार सोपवण्यात आला आहे.
आपल्या भूमिकेला योग्य न्याय देत नसल्यामुळे नॉब्स यांनी स्वत:च राजीनामा देण्याचे ठरवले होते, असा दावा हॉकी इंडियाचे महासचिव नरिंदर बात्रा यांनी केला आहे.  ‘‘ओल्टमन्स यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान नॉब्स यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली होती. त्यांच्या प्रशिक्षण शैलीमध्ये काही दोष जाणवत होते. भारतीय संघ काही बाबतीत कमी पडत होता. त्या चुका सुधारण्यात नॉब्स यांना अपयश येत होते. त्यामुळेच भारताला पराभवाला सामोरे जावे लागत होते. नॉब्स यांना सेवेतून बडतर्फ केल्याचे आम्ही भारतीय क्रीडा प्राधिकरणाला (साई) कळवले आहे.’’
‘साई’चे महासचिव जिजी थॉमसन म्हणाले, ‘‘एक महिन्याच्या नोटिशीच्या आधारे नॉब्स यांची सेवा खंडित करू शकतो, असे कलम करारात होते. नॉब्स यांना पूर्वकल्पना देऊनच त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. हॉकी इंडियाच्या शिफारशीवरूनच नॉब्स यांना नारळ देण्यात आला. नॉब्स हे ‘साई’च्या अखत्यारीत येत असल्यामुळे आम्हीच अंतिम निर्णय घेतला.’’ जून २०११मध्ये भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारणाऱ्या नॉब्स यांना घसघशीत मानधन देऊन पाच वर्षांसाठी करारबद्ध करण्यात आले होते. पण दोन वर्षांतच त्यांची हकालपट्टी करण्यात आली. याआधी स्पेनचे जोस ब्रासा, ऑस्ट्रेलियाचे रिक चाल्सवर्थ आणि जर्मनीचे गेऱ्हार्ड रच यांचीही सेवा अशाच प्रकारे खंडित करण्यात आली होती. भारतीय हॉकीला चांगले दिवस मिळवून देण्यात नॉब्स अपयशी ठरले. २०१२ लंडन ऑलिम्पिकसाठी भारतीय संघ पात्र ठरला, हीच नॉब्स यांच्या प्रशिक्षकपदाखाली भारतीय संघाने केलेली सर्वोत्तम कामगिरी ठरली.