भारतीय हॉकी संघाचा गोलकिपर पी. आर. श्रीजेशला हॉकी इंडियाकडून १५ दिवसांच्या निलंबनाच्या शिक्षेला सामोरं जावं लागणार आहे. मात्र ज्या गुन्ह्यासाठी श्रीजेशला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे, त्यावरुन सध्या क्रीडा क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. विराट कोहली आणि अभिषेक बच्चनच्या ‘Playing for Humanity’ या एनजीओने आयोजित केलेल्या प्रदर्शनीय फुटबॉल सामन्यात खेळल्यामुळे श्रीजेशवर ही कारवाई करण्यात येत आहे.

हॉकी इंडियाच्या नियमावलींचं उल्लंघन केल्याप्रकरणी श्रीजेशला १५ दिवसांच्या निलंबनासह १२ महिने हंगामी खेळाडू म्हणून खेळण्याची नामुष्की आली आहे. ‘Playing for Humanity’ ही संस्था दरवर्षी प्रदर्शनीय सामन्यांचं आयोजन करते. या सामन्यातून उभा केलेला पैसा हा गरजू विद्यार्थी आणि खेळाडूंसाठी वापरला जातो. २०१७ सालात ऑक्टोबर महिन्यात श्रीजेशने या सामन्यात भाग घेतला होता.

गेलं वर्षभर दुखापतीमुळे राष्ट्रीय संघात खेळू न शकलेल्या श्रीजेशने प्रदर्शनीय सामन्यात मात्र सहभाग घेतला. तसेच या सामन्यात सहभागी होण्यासाठी श्रीजेशने हॉकी इंडियाची परवानगीही घेतली नसल्याचं संघटनेतील अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. यासाठी श्रीजेशवर ही कारवाई करण्यात आल्याचं समजतंय. या महिन्यात भारतीय हॉकी संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी श्रीजेशला भारतीय संघात सहभागी केलं जाणार नाहीये. मात्र यानंतर होणाऱ्या सर्व स्पर्धांसाठी श्रीजेश भारताकडून खेळणार आहे.