भारतीय हॉकीची सर्वोच्च संस्था असलेल्या हॉकी इंडियाच्या कार्यालयात करोनाने शिरकाव केला आहे. हॉकी इंडियाच्या कार्यालयातील २ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. परिणामी हॉकी इंडियाचे कार्यालय ठराविक काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हॉकी इंडियाच्या कार्यालयातील ३१ कर्मचाऱ्यांची करोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी दोघे जण करोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले असून आणखी दोघांच्या अहवाल करोनाची लक्षणे दिसली आहेत. त्यामुळे त्यांची पुन्हा करोना चाचणी होणार असल्याचे वृत्त इन्डो एशियन न्यूज सर्व्हिसने दिले आहे.

ज्या दोघांच्या अहवालात करोनाची लक्षणे दिसून आली आहेत त्यांची पुन्हा करोना चाचणी घेतली जाणार आहे अशी माहिती आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी पत्रकाद्वारे दिली. करोनाची लागण झालेल्या दोन कर्मचाऱ्यांपैकी एक अकाऊंट्स विभागातील तर दुसरा ज्युनियर फिल्ड ऑफिसर पदावर कार्यरत आहे. तसेच ज्या दोघांमध्ये करोनाची लक्षणे आढळून आली आहेत, त्यातील एक सहसंचालक आहेत, तर दुसरा डिस्पॅच क्लर्क (कारकून) पदावर कार्यरत आहे, असेही बत्रा यांनी स्पष्ट केले.

कार्यालयातील करोना निगेटिव्ह अहवाल आलेले २५ कर्मचारी यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा देण्यात आली असून त्यांच्या त्यांच्या घरी १४ दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आले आहे. ज्या दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली क्वारंटाइन केले आहे. ज्या दोन कर्मचाऱ्यांमध्ये करोनाची लक्षणे आढळली आहेत, त्यांनादेखील वैद्यकीय देखरेखीखाली घरातच क्वारंटाइन होण्यास सांगितले आहे, असेही बत्रा यांनी जारी केलेल्या पत्रकात नमूद केले आहे.