भारताच्या पुरुष हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा भारताचे उच्च कामगिरी संचालक रोलँन्ट ओल्टमन्स यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. २०१६मधील रिओ ऑलिम्पिकपर्यंत ते प्रशिक्षकपदावर राहणार आहेत.
हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे प्रशिक्षक पॉल व्हॅन अ‍ॅस यांना पदावरून दूर करण्यात आले आहे. ओल्टमन्स यांच्याकडे प्रशिक्षकपद देण्याबाबत बत्रा व भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे सरसंचालक इंजेटी श्रीनिवास यांनी येथे चर्चा करून निर्णय घेतला.
‘‘ओल्टमन्स यांनी ऑलिम्पिक स्पर्धा होईपर्यंत प्रशिक्षक म्हणून काम करण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र त्यानंतरही त्यांनी काम करीत राहावे अशी आमची इच्छा आहे. अ‍ॅस यांना दूर करण्याचा कटू निर्णय आम्हाला घ्यावा लागला मात्र भारतीय हॉकीच्या हितासाठी तो आवश्यक होता. प्रशिक्षक येतात व जातात. आम्हाला खेळाचा विकास घडवायचा आहे. ऑलिम्पिकसाठी भक्कम संघ उभारणी करण्याचे आमचे ध्येय आहे. ओल्टमन्स यांना त्याकरिता सर्वतोपरी सहकार्य केले जाणार आहे,’’ असे बत्रा यांनी सांगितले.
ओल्टमन्स हे गेले तीन वर्षे भारतीय संघाबरोबर काम करीत आहे. त्यांच्याबरोबर खेळाडू व हॉकी इंडियाचे पदाधिकारी यांच्याशी सुसंवाद आहे. त्यामुळेच त्यांच्या निवडीबाबत प्राधान्य देण्यात आले.