लागोपाठ दोन सामन्यांमधील पराभव व त्यानंतर स्पेनशी झालेली बरोबरी यामुळे भारताला अद्यापही विश्वचषक हॉकी स्पर्धेत अपेक्षेइतके यश मिळविता आलेले नाही. त्यामुळे पहिला विजय मिळविण्यासाठी भारताला शनिवारी मलेशियाविरुद्ध सर्वोत्तम कौशल्य दाखवावे लागणार आहे.
या स्पर्धेतील साखळी गटात भारताने तीन सामन्यांमध्ये केवळ एक गुण मिळविला आहे तर मलेशियाला तीन सामन्यांत एकही गुण पटकाविता आलेला नाही. या दुबळ्या संघांमधील लढतीबाबत फारशी उत्सुकता नाही. मात्र भारतीय संघ पहिला विजय मिळविण्यासाठी कसे प्रयत्न करून दाखवितो हेच या लढतीमधील औत्सुक्य असेल.
आजपर्यंत भारताने मलेशियाविरुद्धच्या लढतींमध्ये वर्चस्व गाजविले आहे. त्यामुळे या लढतीसाठी भारताचेच पारडे जड आहे. साखळी गटात शेवटच्या स्थानाची नामुष्की टाळण्यासाठी मलेशियाचे खेळाडू जिद्दीने खेळतील असा अंदाज आहे. यानंतर भारताला शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियासारख्या बलाढय़ संघाशी खेळावे लागणार आहे तर मलेशियाची स्पेनशी गाठ पडणार आहे.