18 October 2018

News Flash

‘चक दे इंडिया’च्या थराराची अनुभूती

बेल्जियमवर मात करत भारत उपांत्य फेरीत

बेल्जियमवर मात करत भारत उपांत्य फेरीत

बेल्जियमने दोन गोलच्या पिछाडीनंतर सामन्यात बरोबरी साधली खरी, मात्र पेनल्टी शूटआऊटच्या वेळी भारताने ‘सडन डेथ’द्वारा त्यांना ६-५ असे पराभूत करत आणि जागतिक हॉकी लीगमध्ये उपांत्य फेरी गाठली. पूर्ण वेळेत हा सामना ३-३ असा बरोबरीत राहिला होता.

कलिंगा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गरुजटसिंग व हरमानप्रीतसिंग यांनी गोल करत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. पण बेल्जियमचा यशस्वी ड्रॅगफ्लिकर लुईक लुईपार्टने दहा मिनिटांमध्ये दोन गोल करत २-२ अशी बरोबरी साधली. भारताचा ड्रॅगफ्लिकर रुपींदरपालसिंगने ४७व्या मिनिटाला गोल करत संघाला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. पण ५३व्या मिनिटाला बेल्जियमच्या सेड्रिक चॅर्लिअर याने गोल करीत सामना ३-३ असा बरोबरीत सोडविला. त्यानंतर पेनल्टी स्ट्रोक्सच्या वेळी पहिल्या पाच संधींमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन गोल नोंदवले. त्यामुळे सामन्यात ५-५ अशी बरोबरी झाली. ‘सडन डेथ’मध्ये हरमानप्रीतने गोल केला. भारताचा गोलरक्षक आकाश चिकटेने सुरेख गोलरक्षण करत बेल्जियमला गोल करण्यापासून वंचित ठेवले आणि संघासाठी विजयश्री खेचून आणली.

सामन्याच्या सुरुवातीपासून दोन्ही संघांनी सावध चाली केल्या. मात्र चौथ्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचा फायदा भारताला घेता आला नाही. पुन्हा २९व्या मिनिटाला भारताने पेनल्टी कॉर्नरची संधी वाया घालविली. त्या तुलनेत बेल्जियमला फारशा हुकमी संधी मिळाल्या नाहीत.

मनप्रीतसिंग याने दिलेल्या पासवर गुर्जंटसिंगने अप्रतिम गोल करत भारताचे खाते उघडले. पाठोपाठ तीन मिनिटांनी भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्याचा फायदा घेत हरमानप्रीतने संघाचा दुसरा गोल केला. या आघाडीचा आनंद भारताला टिकवता आला नाही. त्यानंतर चार मिनिटांनी लुईकने पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेत संघाचा पहिला गोल नोंदविला. पुन्हा त्यानेच आठ मिनिटांनी गोल करत २-२ अशी बरोबरी साधली. त्याचा या स्पर्धेतील हा आठवा गोल आहे. सामन्याच्या ४७व्या मिनिटाला रुपींदरपालसिंगने पेनल्टी कॉर्नरद्वारा संघाला आघाडीवर नेले. पण सहा मिनिटांनी बेल्जियमच्या सेड्रिकने गोल करीत खेळाची रंगत वाढविली. या बरोबरीतच सामना संपला.

First Published on December 7, 2017 2:23 am

Web Title: hockey world league final 2017 india vs belgium