धोकादायक खेळासाठी ओळखल्या जाणाऱ्या इंग्लंडविरुद्ध भारताला सर्वोत्तम कामगिरी करून दाखवता आली तरच जागतिक हॉकी लीगमध्ये उपांत्यपूर्व फेरीचा अडसर त्यांना ओलांडता येईल.
भारताला आतापर्यंत या स्पर्धेत एकही विजय नोंदवता आलेला नाही. एका सामन्यात बरोबरी व दोन सामन्यांमध्ये पराभव अशी त्यांची कामगिरी झालेली आहे. साखळी गटात ते शेवटच्या स्थानावर आहेत. इंग्लंडने दोन विजय नोंदवताना विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का दिला आहे. साखळी गटात ते आघाडीवर आहेत.
सरदार सिंगच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या भारताने ऑलिम्पिक विजेत्या जर्मनीला १-१ असे बरोबरीत रोखले, मात्र त्यांना नेदरलँड्सकडून १-३ असा पराभव पत्करावा लागला आहे.
‘‘भारतीय खेळाडूंची काही मैदानांवर कामगिरी चांगली झाली आहे, तर काही मैदानांवर ते खूप खराब खेळले आहेत. त्यामुळे खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा अपेक्षित आहे. इंग्लंडविरुद्ध आमच्या खेळाडूंना संयमपूर्ण खेळ करावा लागणार आहे. नियोजनबद्ध खेळ करण्यावर आमचे खेळाडू भर देतील अशी अपेक्षा आहे,’’ असे भारतीय संघाचे मुख्य रोलँट ओल्टमन्स यांनी सांगितले.
‘‘गोलपोस्टजवळ केलेले आक्रमण शंभर टक्के यशस्वी कसे होईल, यावर मी त्यांना भर देण्यास सुचविले आहे. चेंडूवर नियंत्रण ठेवण्यावर अधिक लक्ष केंद्रित करावे,’’ अशा सूचना ओल्टमन्स यांनी दिल्या आहेत.

आकाशदीप सिंग, रमणदीप सिंग, एस. व्ही. सुनील, तलवार सिंग, महंमद अमीर यांना सध्या अपेक्षेइतका आक्रमक खेळ करता आलेला नाही. गेल्या तीन सामन्यांमध्ये भारताला केवळ तीन गोल नोंदवता आले आहेत.
‘‘या आघाडी फळीतील खेळाडूंना मी दोषी ठरविणार नाही. कारण काही वेळा त्यांना जर योग्य रीतीने पास मिळाले नाहीत तर ते काहीच करू शकणार नाहीत. मधल्या फळीतील खेळाडूंनीही चेंडूवर अचूक नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे,’’ असे ओल्टमन्स यांनी सांगितले.