पोलंडविरुद्धच्या विजयामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय महिलांना येथील जागतिक हॉकी लीगमध्ये (उपांत्य फेरी) बलाढय़ ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. अव्वल दर्जाच्या ड्रॅगफ्लिकरची अनुपस्थिती हीच त्यांच्यापुढील मोठी समस्या आहे.
पोलंडविरुद्ध भारतास तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले होते, मात्र त्यापैकी दोन संधी त्यांनी वाया घालवल्या होत्या. विश्वचषक उपविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांना पेनल्टी कॉर्नरच्या प्रत्येक संधीचा लाभ घेण्याची आवश्यकता आहे. मात्र या हुकमी संधीवर गोल करण्याची क्षमता असलेल्या खेळाडूंची भारताकडे वानवा आहे. बेल्जियमविरुद्धच्या लढतीत भारताने ०-१ असा पराभव स्वीकारला. या लढतीत भारताने पेनल्टी कॉर्नर वाया घालवला नसता तर हा सामना बरोबरीत ठेवणे त्यांना शक्य झाले असते.
‘‘आमच्याकडे पेनल्टी कॉर्नर तज्ज्ञाचा अभाव आहे. मात्र फील्डगोल करण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य आमच्या खेळाडूंमध्ये निश्चित आहे. संघ निवडीसाठी झालेल्या शिबिरात मी ड्रॅगफ्लिकरची शैली काही अंशी विकसित केलेल्या खेळाडू मी पाहिल्या होत्या. अर्थात, सध्या येथे उपलब्ध असलेल्या खेळाडूंमधूनच मला पेनल्टी कॉर्नरद्वारा गोल कसा केला जाईल याचा प्रयत्न मी करीत आहे. २१ वर्षांखालील भारतीय संघात चांगल्या दर्जाची एक ड्रॅगफ्लिकर आहे, मात्र एवढय़ा लहान वयात तिला संधी देणे योग्य ठरणार नाही,’’ असे भारताचे प्रशिक्षक मथायस एहरान्स यांनी सांगितले.
‘‘आम्ही वेगवेगळ्या डावपेचांवर भर देत आहोत. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंच्या शैलीचा आम्ही बारकाईने अभ्यास केला आहे. त्यानुसार आम्ही आमच्या डावपेचांमध्ये बदल करणार आहोत. आमच्या संघातही काही कनिष्ठ खेळाडूंचा समावेश आहे. त्यांच्यासाठी ही स्पर्धा अतिशय फायदेशीर आहे. येथील अनुभवाचा फायदा घेत त्यांनी भावी कारकीर्द समृद्ध केली पाहिजे,’’ असेही मथायस यांनी सांगितले.