सलग पाच कसोटी सामन्यांमध्ये झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर संघाचे पुनर्वसन करण्यासाठी माजी कर्णधार ग्रेग चॅपल आणि ट्रेव्हर हॉन्स यांची मदत क्रिकेट ऑस्ट्रेलिया घेणार आहे. निवड समितीचे अध्यक्ष रॉड मार्श यांनी बुधवारी पदत्याग केला होता. त्यानंतर हॉन्स यांची समितीच्या हंगामी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या परिस्थितीमधून ऑस्ट्रेलियाचा संघाने बाहेर कसे पडायचे, याचा मार्ग काढण्याचा जबाबदारी चॅपेल यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

हॉन्स यांनी यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीचे अध्यक्षपद भूषवले होते आणि त्या वेळी संघाची कामगिरी चांगली झाली होती. आता निवड समितीमध्ये चॅपेल यांच्यासह माजी सलामीवीर मार्क वॉ आणि प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांचा समावेश असेल.

ऑस्ट्रेलियाने २०१३ साली सलग सहा कसोटी सामने गमावले होते. हॉन्स हे १९९३ ते २००६ या कालावधीमध्ये निवड समितीवर होते. त्यांच्या कार्यकाळामध्ये ऑस्ट्रेलियाने दोन विश्वचषक जिंकले, त्याचबरोबर सलग १६ कसोटी विजयाचा विक्रमही संघाने रचला होता. सध्या हॉन्स यांच्याकडे निवड समितीचे अध्यक्षपद असले तरी यानंतर माजी कर्णधार स्टीव्ह वॉ, रिकी पॉन्टिंग आणि माजी वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पी या पदासाठी शर्यतीत असल्याचे म्हटले जात आहे.

‘हॉन्स यांना निवड समितीचा दांडगा अनुभव आहे. त्याचबरोबर चॅपेल यांना क्रिकेटचे सखोल ज्ञान आहे, तसेच युवा खेळाडूंची त्यांना चांगली माहिती आहे. त्यामुळे या दोघांना निवड समितीमध्ये स्थान देण्यात आले आहे,’ असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष डेव्हिड पीव्हर यांनी सांगितले.

 

उसळता चेंडू व्होग्सच्या डोक्यावर आदळला

पीटीआय : स्थानिक सामन्यामध्ये फलंदाजी करीत असताना ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू अ‍ॅडम व्होग्स याच्या डोक्यावर उसळता चेंडू बसला. डोक्यावर चेंडू आदळल्यावर मैदानातील डॉक्टरांनी थेट त्याच्याकडे धाव घेतली आणि त्याच्यावर तातडीने उपचार केले.

व्होग्सला गंभीर दुखापत झाली नसली तरी त्याने हा सामना न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी तो संघासाठी उपलब्ध असेल का, यावर प्रश्नचिन्ह आहे.

शेफिल्ड शिल्ड प्रथम श्रेणी सामन्यामध्ये पश्चिम ऑस्ट्रेलिया संघाकडून व्होग्स फलंदाजी करीत होता. त्या वेळी व्होग्सला टास्मानियाचा वेगवान गोलंदाज कॅम स्टीव्हन्सनचा उसळता चेंडू डोक्याच्या मागच्या बाजूला लागला. चेंडू लागल्यावर व्होग्स थेट गुडघ्यांवर पडला. त्यानंतर मैदानातील उपस्थित खेळाडूंनी त्याच्याकडे धाव घेतली आणि डॉक्टरांच्या उपचारामुळे तो बचावला.