प्रत्येक गोष्टीचा शेवट हा ठरलेलाच. या जगात काहीही स्थावर नाही. प्रत्येक प्रवास हा एका ठिकाणी येऊन संपतोच. पण हा प्रवास तुम्ही कसा केलात आणि इतरांना काय दिलं, हे महत्त्वाचं. कोणताही प्रतिस्पर्धी आपल्याला लाडका वाटूच शकत नाही आणि जर रणांगण क्रिकेटचे असेल तर बातच सोडा. पण याला अपवाद काही मोजके क्रिकेटपटू आहेतच. प्रतिस्पर्धी असूनही तो कधीही परका वाटला नाही किंवा त्याची चीड, राग यावा असेही कधी झाले नाही. महान खेळाडू असेच असतात. ते स्वत:हून मान सन्मान कमावतात. कधी कोणाकडे काहीही न मागता जगाला आपली दखल घ्यायला भाग पाडतात, असाच एक महान क्रिकेटपटू निवृत्तीच्या उंबरठय़ावर आहे आणि तो म्हणजे कुमार संगकारा. भारताविरुद्धच्या कोलंबो येथील दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर संगकारा क्रिकेटला अलविदा करणार आहे.
वर्गात एखादा हुशार विद्यार्थी असावा, नंबरात येणारा, चेहऱ्यावर त्याच्या हुशारीचं तेज असावं आणि कायम जमिनीवर पाय रोवून त्याने इतरांशी वागावं, असं चित्र दुर्मीळच, संगकाराही त्यातलंच एक आश्चर्य. एक सर्वकालीन महान डावखुरा फलंदाज, असं संगकाराचं वर्णन करता येईल. कारण फक्त कसोटी क्रिकेटच नाही तर एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्येही त्याने आपल्या कामगिरीचा अमिट ठसा उमटवलेला आहे. तब्बल ११ द्विशतकं झळकावणारा सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतरचा दुसरा फलंदाज. यावरून तरी त्याला महान फलंदाजाची उपाधी द्यायलाच हवी.
श्रीलंकेतील कॅण्डीमध्ये कुमारचे बालपण गेले. एका बाजूला तळं आणि दुसऱ्या बाजूला टेनिस क्लब, दोन्हीही त्याच्या आवडत्या गोष्टी. वडील क्षेमा हेदेखील एक खेळाडू. वडिलांचा संगकारावर फार मोठा प्रभाव नेहमीच दिसला. चार भावंडांमध्ये कुमार हे शेंडेफळ, पण वडिलांच्या पावलावर पाऊल टाकणारा एकमेव मुलगा. वडिलांसारखं त्यालाही क्रीडापटू व्हायचं होतं. शाळेमध्ये तर तो एवढे खेळ खेळायचा की हा मोठेपणी कोण होणार हे सांगता येणं कठीण होतं. क्रिकेटबरोबर गोल्फ, बॅडमिंटन, टेनिस, टेबल टेनिस, जलतरणसारख्या खेळांमध्ये त्याने अनेक बक्षिसं जिंकली होती. वडिलांना जशी साहित्याची आवड तशी त्यालाही. वडिलांनी कायद्याची पदवी घेतलेली, पण क्रिकेटमुळे संगकारा मात्र हे जमलेले नाही. पण आता निवृत्तीनंतर तो कायद्याची पदवीही मिळवणार आहे.
सातव्या वर्षांपासून संगकारा क्रिकेट खेळायला लागला आणि सुनील फर्नाडो यांच्याकडे खासगी कोचिंगला तो जायचा, जिथे त्याची भेट झाली ती महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनशी. मुरली त्याला ५ वर्षांनी मोठा होता. १२व्या वर्षी त्याने क्रिकेट गंभीरपणे खेळायचा निर्णय घेतला आणि त्यानंतर त्याने शाळा आणि क्लब क्रिकेट गाजवले. १७व्या वर्षी नेमके काय करायचे, याचा प्रश्न त्याला पडला होता, कारण टेनिस आणि क्रिकेट हे दोन्ही त्याचे आवडते खेळ आणि दोन्हीमध्ये चांगली कामगिरी होतच होती. अखेर कुमारने क्रिकेटची निवड केली आणि सारं काही तुमच्यासमोर आहे. याच सतराव्या वर्षी येहाली आणि कुमार एकमेकांच्या प्रेमात पडले आणि काही वर्षांतच त्यांनी लग्नही केले.
स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत श्रीलंकेच्या ‘अ’ संघात स्थान मिळवले. मायदेशात झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात कुमार नाबाद १५६ धावांची खेळी साकारली. या खेळीतला एक षटकार थेट पॅव्हेलियनच्या खिडकीवर आदळला होता. हेच प्रशिक्षक डेव्ह वॉटमोर यांनी हेरले आणि कुमार राष्ट्रीय संघात दाखल झाला. पहिल्याच मालिकेत तो मालिकावीर ठरला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मैदानावरील मालिकेत त्याने कसोटी पदार्पण केले. पण हे पदार्पण विशेष गाजले नाही. यानंतर श्रीलंका आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेली आणि तिथून इतिहास रचायला सुरुवात झाली. कुमारला महेला जयवर्धनेची साथ लाभली. मैदानाबरोबरच मैदानाबाहेरही त्यांची मैत्री गाजते आहे. या दौऱ्यापासून या दोघांची भागीदारी गाजायला सुरुवात झाली. सनथ जयसूर्याच्या गैरहजेरीत सेंच्युरियनच्या कसोटीमध्ये कुमार सलामीला आला आणि त्याचे शतक एका चुकीच्या निर्णयाने दोन धावांनी हुकले. त्यानंतर तब्बल सहा महिने त्याला शतकासाठी वाट पाहावी लागली आणि पहिले शतक झळकावले ते भाराताविरुद्धच. या शतकानंतर शतके आणि धावांच्या राशी उभारायला संगकाराला जास्त वेळ लागला नाही. पाकिस्तानविरुद्ध त्याने पहिले द्विशतक झळकावले आणि त्यानंतर दहा द्विशतके आपल्या नावावर केली. काही वेळातच तो ‘रन मशीन’ म्हणूनही ओळखला जाऊ लागला. २००३ साली तो पहिला विश्वचषक खेळला. या विश्वचषकासाठी अरविंद डिसिल्व्हा आणि हशन तिलकरत्ने यांचे संघात पुनरागमन झाले आणि तो तिसऱ्या क्रमांकावरून सातव्या क्रमांकावर फेकला गेला. निश्चितच कामगिरीवर परिणाम झालाच. पण त्यानंतर तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायला लागला आणि यष्टीरक्षणाचीही जबाबदारी त्याने पेलली.
२००४ची गोष्ट. संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर होता आणि मायदेशात त्सुनामीने थैमान घातले होते. क्रिकेट सोडून संघ लंकेत परतला, जयवर्धने आणि मुरली यांच्याबरोबर कुमारने देश पिंजून काढला. मुरलीच्या फाऊंडेशनबरोबर काम करत त्यांनी जवळपास एक हजार घरे नव्याने वसवली.
२००६ साली मव्‍‌र्हन अट्टापटू जायबंदी झाल्याने जयवर्धने कर्णधार तर कुमार उपकर्णधार झाला. ही जबाबदारी स्वीकारल्यावर दुसऱ्याच मालिकेत या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ६२४ धावांची विक्रमी भागीदारी रचली. यामध्ये कुमारचा वाटा २८७ धावांचा होता. चेंडू बॅटवर कसा घ्यायचा, फटके कसे मारायचे, फलंदाजीचे तंत्र आणि शिस्त, समर्पण कसे असायला हवे, याचा उत्तम वस्तुपाठ म्हणजे ही खेळी होती. २००९ साली त्याच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ पडली, मुरली त्या वेळी उपकर्णधार होता. इंग्लंडमधल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात त्याने संघाला अंतिम फेरीपर्यंत नेले, पण जेतेपद पटकावता आले नाही. त्यानंतर पाकिस्तानच्या दौऱ्यात लाहोरमध्ये संघावर दहशतवादी हल्ला झाला आणि कुमार त्यामध्ये जखमी झाला. पण हार न मानता तो पुन्हा लगेच मैदानात उतरला आणि संघाची एक वेगळी ओळख निर्माण केली. कुमारच्या कर्णधारपदाच्या कारकीर्दीत श्रीलंकेचा संघ चांगलाच बहरला होता. २०११च्या विश्वचषकात कुमारच्या नेतृत्वाखाली संघाने पुन्हा अंतिम फेरी गाठली, पण उपविजेतेपदच त्यांच्या पदरी पडले. आगामी विश्वचषकाच्या तयारीसाठी त्याने युवा कर्णधार नेमण्याची विनंती करत कर्णधारपद सोडले. बांगलादेशमध्ये संघाने ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकला तेव्हा त्याने या प्रकारातून निवृत्ती घेतली. २०१५च्या विश्वचषकातून त्याने एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केला आणि आता काळाची गरज ओळखत तो कसोटी क्रिकेटलाही पूर्णविराम देत आहे.
कुमार म्हणजे एक अद्भुत डावखुरा फलंदाज. डावखुऱ्या फलंदाजांमध्ये अव्वल. यष्टीरक्षण करून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी तो यायचा. प्रामाणिकपणे त्याने क्रिकेटची सेवा केली, पण कधीही प्रसिद्धीच्या झोतात आला नाही. कधीही वादविवाद नाही किंवा मैदानाबाहेरची लफडी नाहीत. एक आदर्श क्रिकेटपटू कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण. कुमारचा तेजस्वी, हसरा चेहरा पाहिल्यावर सारे काही विसरायला होते, तो प्रतिस्पर्धी आहे हेदेखील. आपल्या गोलंदाजांची धुलाई करत असतानाही आपल्याला त्याच्या फलंदाजीतली महानता कळते, यातच सारे आले. पण त्याला जेवढी प्रसिद्धी किंवा ग्लॅमर मिळायला हवे होते तेवढे मात्र नक्कीच मिळाले नाही. आंतरराष्ट्रीय मान-सन्मानांच्या बाबतीतही तो बऱ्याचदा डावलला गेला, पण कुठलीही खंत नाही किंवा शल्य नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही ग्लॅमरने नटलेल्या खेळाडूंमुळे कुमार झाकोळला गेला, एका शापित गंधर्वासारखा. पण त्याच्या चाहत्यांना मात्र कुठल्याही देशाची सीमा रोखू शकली नाही. जगभरात त्याचे चाहते. पैसा, प्रसिद्धी, ग्लॅमर, जाहिराती, मान-सन्मान, पुरस्कार याच्यापेक्षाही त्यासाठी नेहमीच खेळ आणि चाहते महत्त्वाचे होते. खेळाची निस्सीमपणे सेवा त्याने केली. प्रामाणिकपणा, शिस्त, समर्पण, चिकाटी, जिद्द याची त्याला जोड होतीच. आता तो निवृत्तीच्या उंबरठय़ावर असला तरी क्रिकेट आणि चाहत्यांच्या मनात हा सच्चा एक क्रिकेटपटू नेहमीच कुमार राहील.