भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला हाँगकाँग ओपन सुपरसिरीज स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला आहे. तैवानच्या ताई त्झु विंगने सिंधूचा २१-१८, २१-१८ अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. अवघ्या ४५ मिनीटांमध्ये विंगने सिंधूचं आव्हान परतवून लावत आपलं विजेतेपद राखलं.

सामन्याच्या सुरुवातीच्या मिनीटापासून विंगने आघाडी घेत आपलं वर्चस्व राखलं होतं. ७-३ अशा आघाडीवर असताना काही क्षणांसाठी सिंधूने काही चांगल्या गुणांची कमाई करत सामन्यात परतण्याचा प्रयत्न केला. मात्र पहिल्या सेटच्या मध्यांतरापर्यंत विंगने सिंधूला आघाडी घेण्याची संधी दिली नाही. मध्यांतराला विंगकडे ११-८ अशी आघाडी होती. मध्यांतरानंतर सिंधू विंगला टक्कर देईल असा अंदाज वर्तवला जात होता, मात्र विंगने आपली २-३ गुणांची आघाडी कायम ठेवत अखेरीस पहिला सेट २१-१८ असा खिशात घातला.

दुसऱ्या सेटमध्ये सिंधू सामन्यात पुनरागमन करेल असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला होता. मात्र प्रत्यक्ष सामन्यात विंगने सुरुवातीच्या क्षणांमध्ये आघाडी कायम ठेवली. मात्र यानंतर सिंधूने सामन्यात विंगला आश्चर्याचा धक्का देत बरोबरी साधली. दुसऱ्या सेटमध्ये दोनही खेळाडू एकमेकींना मोठी आघाडी घेऊ देत नव्हत्या, ज्यामुळे सामन्यात रंगत आणखीनच वाढत गेली. अखेर अटीतटीच्या या लढतीत सिंधूने दुसऱ्या सेटच्या मध्यांतरापर्यंत ११-९ अशी आघाडी घेतली. या आघाडीच्या जोरावर सिंधू सामन्यात पुनरागमन करेल अशी चिन्ह निर्माण झाली होती. मात्र मध्यांतरानंतर सिंधूवर एकामागोमाग एक स्मॅशचा मारा करत विंगने सामन्यात दणक्यात पुनरागमन करत आघाडी घेतली.

२ गुणांनी आघाडीवर असलेली सिंधू दुसऱ्या सेटमध्ये अचानक १२-१६ अशी पिछाडीवर पडली. यानंतर सिंधूने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र विंगच्या खेळासमोर तिची डाळ शिजू शकली नाही. अखेर विंगने दुसरा सेट २१-१८ अशा फरकाने जिंकत स्पर्धेचं विजेतेपद आपल्या नावे केलं.