Hong Kong Open Badminton – या स्पर्धेत पुरुष एकेरीच्या गटात स्विस आणि हैदराबाद खुल्या बॅडमिंटन स्पर्धांचे विजेतेपद पटकावणाऱ्या समीर वर्मा याला उपांत्यपूर्व फेरीत गाशा गुंडाळावा लागला. त्याच्या पराभवाबरोबरच भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. यजमान देशाच्या ली चेक यू याने त्याला १५-२१, २१-१९, ११-२१ असे पराभूत केले. पहिला गेम यू याने २१-१५ असा जिंकला होता. मात्र दुसरा गेम समीरने २१-१९ असा जिंकल्यामुळे शेवटचा गेम निर्णायक ठरला. त्या गेममध्ये मात्र यू ने २१-११ अशी समीरला मात दिली आणि सामना खिशात घातला.

त्याआधीच्या फेरीत समीर वर्मा याला सामना न खेळताच पुढील फेरीचे तिकीट मिळाले होते. समीरचा दुसऱ्या फेरीतील सामना चीनच्या चेन लॉंग याच्याशी होता. पण लॉंगने दुखापतीच्या कारणामुळे स्पर्धेतून माघार घेतली. त्यामुळे समीरला सामना खेळावा लागला नाही. आधीच्या फेरीत त्याने थायलंडच्या सुपान्यू अविहींग्सनॉन याचा पराभव केला होता. त्याने सरळ गेममध्ये हा सामना खिशात घातला होता. पहिला गेम २१-१७ने जिंकल्यावर दुसऱ्या गेममध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूंकडून झुंज पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. पण ती अपेक्षा फोल ठरली होती आणि दुसरा गेम २१-१४ ने जिंकत समीरने पुढील फेरीत प्रवेश केला होता.