हाँगकाँग खुली बॅडमिंटन स्पर्धा

हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मिश्र दुहेरीमध्ये सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी आणि अश्विनी पोनप्पा यांनी विजयी सलामी नोंदवली, तर प्रणव जेरी चोप्रा आणि एन. सिक्की रेड्डीचे आव्हान संपुष्टात आले.

सात्त्विक आणि अश्विनी जोडीने ५५ मिनिटे चाललेल्या सामन्यात थायलंडच्या निपिटफोन फुआंगफुआपेट आणि सावित्री अमित्रापाय जोडीचा १६-२१, २१-१९, २१-१७ असा पराभव केला. मग थायलंडच्या तिसऱ्या मानांकित देशापोल पुआव्हारानुखरोह आणि सॅपसिरी ताईरॅटानाचाय जोडीने प्रणव-सिक्की जोडीला २१-१०, २१-१८ अशा फरकाने सहज नामोहरम केले.

सात्त्विक-चिरागची आगेकूच

सात्त्विक आणि चिराग या जोडीने पुरुष दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत दोन स्थानांनी आगेकूच करताना सातवे स्थान गाठले आहे. त्यांनी नुकतीच चीन खुल्या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. याचप्रमाणे बी. साईप्रणीतने पुरुष एकेरीच्या क्रमवारीतील १०वे स्थान गाठले आहे, तर श्रीकांतची तीन स्थानांनी घसरण झाली असून, तो १३व्या स्थानावर आहे.

सौरभ मुख्य फेरीसाठी पात्र

दोन पात्रतेच्या सामन्यांमध्ये आरामात विजय मिळवत भारताच्या सौरभ वर्माने हाँगकाँग खुल्या स्पर्धेची मुख्य फेरी गाठली आहे. पात्रता फेरीतील पहिल्या सामन्यात सौरभने थायलंडच्या टॅनाँगसॅक साइनसॉमबूनसूकचा २१-१५, २१-१९ असा पराभव केला, तर दुसऱ्या सामन्यात फ्रान्सच्या लुकास क्लेअरबोटला २१-१९, २१-१९ असे नमवले.