हाँगकाँग खुली बॅडमिंटन स्पर्धा

भारताचा पुरुष एकेरीतील आघाडीचा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने गुरुवारी हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. श्रीकांतने एप्रिल महिन्यानंतर प्रथमच एखाद्या स्पर्धेच्या अंतिम आठ खेळाडूंत स्थान मिळवले आहे. मात्र जगज्जेती पी. व्ही. सिंधूला पुन्हा एकदा दुसऱ्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला.

जागतिक क्रमवारीत १३व्या स्थानी असलेल्या श्रीकांतने उपउपांत्यपूर्व सामन्यात भारताच्याच सौरभ वर्माला २१-११, १५-२१, २१-१९ असे तीन गेममध्ये पराभूत केले. उपांत्यपूर्व फेरीत त्याचा चीनचा ऑलिम्पिक विजेता चेन लाँग याच्याशी सामना होईल. क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या सिंधूला थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफान हिच्याकडून १८-२१, २१-११, १६-२१ अशी हार पत्करावी लागली. जागतिक स्पर्धेनंतर सिंधूची कामगिरी खालावत चालली आहे. सिंधूविरुद्ध बुसानन हिचा पहिला विजय ठरला.

एप्रिल महिन्यात झालेल्या सिंगापूर बॅडमिंटन स्पर्धेत श्रीकांतने उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. त्याशिवाय गेल्या तीन महिन्यांत झालेल्या कोरिया, डेन्मार्क, फ्रेंच आणि चीन या स्पर्धामध्ये त्याचे अनेक वेळा दुसऱ्या फेरीपूर्वीच आव्हान संपुष्टात आले.

कश्यपची वाटचाल खंडित

भारताच्या पारुपल्ली कश्यपने दुसऱ्या फेरीत कडवी लढत दिली असली तरी त्याला चायनीज तैपेईच्या दुसऱ्या मानांकित चोऊ टिएन चेन याच्याकडून १२-२१, २३-२१, २१-१० असा पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

प्रणॉयचे आव्हान संपुष्टात

एच. एस. प्रणॉयला गुरुवारी पुरुष एकेरीतून गाशा गुंडाळावा लागला. इंडोनेशियाच्या सहाव्या मानांकित जोनाथन ख्रिस्टिने प्रणॉयला २१-१२, २१-१९ अशी सरळ दोन गेममध्ये धूळ चारली. मिश्र दुहेरीत सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि अश्विनी पोनप्पा यांना जपानच्या युटा वाटानाबे आणि अरिसा हिगाशिनो या जोडीने १९-२१, १२-२१ असे सहज हरवले.