“आशिया चषकातील भारताविरुद्धच्या त्या सामन्याआधी राष्ट्रगीत सुरु होताच माझ्या अंगावर काटा आला होता…विरोधात खेळतोय हे माहीत असूनही आपसूकच मी राष्ट्रगीत गुणगुणत होतो…त्या क्षणी मी आता भविष्यात भारतासाठी खेळू शकतो याची मला जाणीव झाली…”, हे शब्द आहेत भारतीय वंशाचा हॉंगकाँग क्रिकेट संघाचा कर्णधार अंशुमन रथ(वय-21) याचे. एप्रिल महिन्यात झालेल्या वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हिजन-2 मध्ये खराब कामगिरीनंतर हॉंगकॉंग संघाने वनडे क्रिकेटचा दर्जा गमावला त्यानंतर अंशुमन रथ याने संघाला रामराम ठोकला. आता भारताकडून क्रिकेट खेळण्याचे, प्रामुख्याने भारताच्या कसोटी संघातून खेळण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी त्याने भारतात परतण्याचं ठरवलंय. त्याने भारतीय संघासाठी खेळण्याची आपली इच्छा जाहीर केली आहे.

मूळचा भुवनेश्वरचा असलेला अंशुमन रथ याने इएसपीएन-क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत भविष्यात टीम इंडियासाठी खेळण्याचा इरादा स्पष्ट केलाय. लवकरच तो भारतात परतणार असून स्थानिक खेळाडू म्हणून पात्र ठरणे आणि नंतर स्वतःला सिद्ध करणे हे त्याचं मुख्य उद्दिष्ट असणार आहे. स्वतःला सिद्ध करून एक दिवस टीम इंडियासाठी खेळण्याचा त्याला विश्वास आहे. सलग दोन वेळेच्या रणजी विजेत्या विदर्भाच्या संघातून खेळण्याचं अंशुमनचं लक्ष्य आहे. यासंदर्भात गेल्या काही आठवड्यापासून त्याची विदर्भ क्रिकेट संघटनेचे (व्हीसीए) संचालक प्रशांत वैद्य यांच्याशी चर्चा सुरू आहे. अद्याप ही चर्चा पूर्णत्वास गेलेली नसली तरी कागदपत्रांची पूर्तता लवकरच होईल अशी आशा अंशुमनला आहे. भारताचा पासपोर्ट असला म्हणून लगेच भारताच्या स्थानिक क्रिकेटमध्ये संधी मिळत नाही याची अंशुमनला पूर्ण कल्पना आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये पात्र ठरण्यासाठी त्याला नियमानुसार एक वर्षाचा कालावधी काढावा लागेल, त्यानंतर ऑक्टोबर 2020 मध्ये तो पात्र ठरेल. नंतर आयपीएलसाठी देखील ‘अनकॅप्ड’ खेळाडू म्हणून लिलावात तो उपलब्ध असेल. पण, सध्या नागपूरच्या क्लब क्रिकेटमधून सुरुवात करण्याचं त्याने निश्चित केलंय.

“माझ्याबाबत बीसीसीआयचे महाव्यवस्थापक सबा करीम यांच्याशी व्हीसीएच्या अधिकाऱ्यांची चर्चा झाली आहे…मिळालेल्या सर्व संकेतांवरून विदर्भाच्याच संघात मी खेळताना दिसू शकतो…त्यासाठी मला क्लब क्रिकेटमध्ये कठोर परिश्रम घेऊन शानदार कामगिरीद्वारे विदर्भाच्या रणजी संघाचे दरवाजे ठोठवावे लागतील. त्यांनी सलग दोन वेळेस रणजी चषकावर नाव कोरलंय…त्यांची वेगळी विश्वासार्हता आणि प्रतिष्ठा आहे. भारतात असलेल्या अनेक प्रतिभावान तरुण खेळाडूंमुळे मला दुर्लक्षित करणं कोणत्याही रणजी संघाला खूप सोपं आहे. पण, व्हीसीएने मला पूर्ण पाठिंबा दिला असून ‘दरवाजे खुले आहेत’ असा संदेश त्यांच्याकडून मिळालाय. त्यांनी मला तेथील क्लबपद्धतीविषयीही माहिती दिली आहे. चांगली कामगिरी करेन आणि त्यांच्या रणजी संघात जागा पटकावेन अशी अपेक्षा आहे. शेवटी जर धावा केल्या तरच निवड होईल…” असं अंशुमन म्हणाला. डावखुरा फलंदाज आणि पर्यायी यष्टीरक्षक असलेल्या अंशुमनला 2018 मध्ये भारताविरोधात झालेल्या सामन्याविषयी विचारलं असता त्याने, “त्या सामन्याआधी राष्ट्रगीत सुरु होताच माझ्या अंगावर काटा आला होता…विरोधात खेळतोय हे माहीत असूनही आपसूकच मी राष्ट्रगीत गुणगुणत होतो…त्या क्षणी मी आता भविष्यात भारतासाठी खेळू शकतो याची मला जाणीव झाली…”,अशी प्रतिक्रिया दिली. या सामन्यात सलामीला आलेल्या अंशुमन रथ आणि निझाकत खान या जोडीने 174 धावांची शानदार सलामी दिली होती. या जोरावर 286 धावांचा पाठलाग करताना हाँगकाँगचा संघ केवळ 26 धावांनी पराभूत झाला होता, पण रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाला अंशुमनच्या संघाने चांगलंच झुंजवलं होतं. अंशुमन रथ याची एकदिवसीय कारकीर्द शानदार राहिली असून त्याने हॉंगकाँगसाठी 18 एकदिवसीय सामने खेळलेत. या सामन्यांत त्याने 51.75 च्या सरासरीने 828 धावा केल्या आहेत. कारकिर्दीतील काही चुकीच्या निर्णयासाठी अंशुमन इंग्लडमधील एका घटनेला जबाबदार ठरवतो. इंग्लडमधून शालेय शिक्षण घेताना चांगल्या कामगिरीमुळे युवा प्रतिभावान खेळाडू म्हणून अंशुमनसह इंग्लडचा सध्याचा स्टार खेळाडू सॅम करण, ऑली पॉप अशा खेळाडूंची नावे चर्चेत होती. प्रसिद्ध काऊंटी क्लब मिडलसेक्समधून खेळण्याची ऑफरही त्याला मिळाली होती. पण, सहयोगी देशातील खेळाडूंना कायमस्वरुपी व्हिसा देण्याच्या नियमातील अडचणींमुळे त्याला मिडलसेक्सची ऑफर स्वीकारता आली नाही, आणि तो हाँगकाँगला परतला. “भारतासाठी क्रिकेट खेळणे माझे स्वप्न आहे… त्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करून मिळेल त्या संधीचं सोनं करण्याचा माझा प्रयत्न असेल…शाश्वती देता येणार नाही पण किमान एवढं तरी नक्की की आता चेंडू माझ्या कोर्टात आहे आणि मार्ग समोर आहे…”, असं म्हणत अंशुमनने टीम इंडियाकडून नवी इनिंग सुरू करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. आता बीसीसीआय त्याला रणजी सामन्यांत संधी देते की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.