सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर पूर्णपणे सहमत आहे, अशी प्रतिक्रिया ‘बीसीसीआय’च्या सचिव पदावरून हटविण्यात आल्यानंतर अजय शिर्के यांनी दिली. फक्त बीसीसीआयची प्रतिम जागतिक पातळीवर ढासळू नये हिच आशा असल्याचेही ते म्हणाले.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर माझे काहीच म्हणणे नाही. कोर्टाचा निर्णय मला मान्य आहे. बीसीसीआयमधील माझी भूमिका आता संपुष्टात आली आहे. इतिहासात जाण्यात कोणतेच कारण नाही. प्रत्येकाची त्याबद्दल वेगवेगळी मतं असू शकतात. सचिव पदाशी माझे वैयक्तिक असे कोणतेच नाते नाही. याआधी मी स्वत: देखील पदाचा राजीनामा दिला आहे आणि माझ्याकडे याशिवाय इतरही काही महत्त्वाच्या गोष्टी करण्यासारख्या आहेत. त्यामुळे वैयक्तिक असे मला काहीच वाटत नाही. फक्त बीसीसीआयची प्रतिमा जागतिक पातळीवर ढासळू नये, असे अजय शिर्के म्हणाले.

वाचा: सुप्रीम कोर्टाकडून अनुराग ठाकूर आणि अजय शिर्के यांची ‘विकेट’, पदावरून हटवले

सचिव पदाची जागा रिकामी होती आणि माझी बिनविरोध निवड झाली होती. आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे मी त्यापदावर देखील नाही. पण त्यामुळे मला वैयक्तिक असा कोणताही तोटा झाला असे मला वाटत नाही. मला कोर्टाचा निर्णय मान्य आहे आणि माझे त्यावर काहीच म्हणणे नाही, असेही ते पुढे म्हणाले.

वाचा: क्रिकेटचा विजय झाला, आता अन्य खेळांचाही होऊ दे- न्यायमूर्ती लोढा

[jwplayer Wz5kUyFh]

 

लोढा समितीने सुचविलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्याने सुप्रीम कोर्टाने सोमवारी बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांची पदावरून हकालपट्टी केली. याशिवाय नव्या पदाधिकाऱयांची नेमणूक करण्याची जबाबदारी न्यायमित्रांकडे दिली आहे. येत्या १९ जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे. नवे पदाधिकारी बीसीसीआयने आजवर केलेल्या चांगल्या कामाला यापुढे देखील सुरूच ठेवतील, अशी आशा असल्याचे अजय शिर्के म्हणाले. बीसीसीआयची प्रतिमा यापुढील काळातही अशीच सर्वोच्च स्थानी राहिल आणि भारतीय संघाने तिन्ही प्रकारात वर्चस्व गाजवावे, असे शिर्के म्हणाले.

[jwplayer NfsYpGEf]