भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणे गेले काही महिने वन-डे आणि टी-२० क्रिकेटपासून दूर आहे. फेब्रुवारी २०१८ साली आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळलेल्या अजिंक्य रहाणेला अद्याप वन-डे संघात पुनरागमन करता आलेलं नाहीये. मात्र अजुनही अजिंक्य वन-डे संघात पुनरागमनाबद्दल आशावादी आहे. पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलाताना अजिंक्यने माहिती दिली.

जाणून घ्या नेमकं काय म्हणाला अजिंक्य??

“गेली दोन वर्ष, माझा खेळ चांगला होतोय असं मी कोणालाही सांगत नाहीये, पण खरंच माझा खेळ चांगला होतोय. तुम्ही आकडेवारी तपासू शकता. क्रिकेट हा मजेशीर खेळ आहे, यात काहीही होऊ शकतं. मी अजुनही वन-डे संघात पुनरागमन करण्याबद्दल आशावादी आहे.”

आपण यशाच्या मागे धावत असताना कधीतरी आपल्यालाच वाटतं की जरा थांबायला हवं, पुन्हा एकदा विचार करायला हवा. २०१९ विश्वचषक स्पर्धेत माझी निवड झाली नाही, त्यावेळी मी नेमकं हेच केलं. इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळत असताना मी खूप काही शिकलो. मी सध्या खूप चांगल्या फॉर्मात आहे, आणि विंडीज दौऱ्यापासून मी सातत्याने कामगिरी करतोय, अजिंक्य आपल्या फॉर्मबद्दल बोलत होता.

काय सांगते अजिंक्यची वन-डे क्रिकेटमधली आकडेवारी??

आतापर्यंत ९० वन-डे सामने खेळलेल्या अजिंक्य रहाणेच्या नावावर २ हजार ९६२ धावा जमा आहेत. १११ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. वन-डे क्रिकेटमध्ये अजिंक्यला तुलनेने कमी संधी मिळाली, मात्र ज्यावेळी संधी मिळाली, त्यामध्येही त्याच्या कामगिरीत सातत्य नव्हतं.

२०१८ दक्षिण आफ्रिका दौऱ्यात अजिंक्यला ६ वन-डे सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. ज्यात तो फक्त १४० धावा करु शकला. यामध्ये तो केवळ एकदाच अर्धशतकी खेळी करु शकला. त्यामुळे आगामी काळात वन-डे क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचं अजिंक्य रहाणेचं स्वप्न खरं ठरतंय का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.