एरवी विद्यार्थ्यांना शाळेत नेण्याआणण्यात गर्क असणाऱ्या रिक्षावाले काकांनी शाळेतील मैदानात फुटबॉलचा आनंद घेतला नाही तर नवलच. त्यांच्याप्रमाणेच अश्वारोहणाद्वारे वेगवेगळ्या गडांवर मोहिमा करणाऱ्यांनीही फुटबॉलमधील आपले कौशल्य आजमावण्याचा प्रयत्न करीत या खेळाचीही हौस फिटवून घेतली.

भारतात पुढील महिन्यात १७ वर्षांखालील गटाची विश्वचषक फुटबॉल स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. देशात प्रथमच फुटबॉलची एवढी मोठी स्पर्धा होत असल्यामुळे त्यासाठी वातावरण निर्माण व्हावे, या दृष्टीने राज्य शासनातर्फे राज्यभर पंधरा सप्टेंबर हा फुटबॉल दिन म्हणून साजरा करण्यात आला. रेणुका स्वरूप प्रशालेतर्फे रिक्षावाले काकांकरिता प्रदर्शनीय सामना घेण्यात आला. शाळेतील मैदानात रिक्षावाले काकांनी जेव्हा फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली. त्या वेळी शाळेतील मुलींनी एकच जल्लोष करीत त्यांच्या कौशल्यास दाद दिली. या सामन्याचे वेळी मुख्याध्यापिका जयश्री शिंदे, पर्यवेक्षिका विजयमाला घुमे, बी. डी. शिंदे आदी उपस्थित होते.

नऱ्हे आंबेगाव येथील शिवसृष्टीच्या मैदानावर दिग्विजय फाउंडेशन व डेक्कन इक्वेस्ट्रियन असोसिएशनतर्फे अश्वारोहकांमधील फुटबॉलचा सामना घेण्यात आला. घोडय़ावरून फुटबॉल खेळणे सोयीचे जावे यासाठी अडीच फूट उंचीचा मोठा चेंडू तयार करण्यात आला होता. वीस मिनिटांच्या सामन्यांमध्ये काजल बोरसे, मोहित बच्छाव, अनिकेत हलभावी, श्रीया पुरंदरे यांनी भाग घेतला. खेळाडूंप्रमाणेच घोडय़ांनीही हा चेंडू मारून उपस्थितांना आश्चर्याचा धक्का दिला. दिग्विजय फाउंडेशनचे गुणेश पुरंदरे व विनायक हळबे यांनी या सामन्याचे संयोजन केले. या वेळी जिल्हा क्रीडाधिकारी विजय संतान, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र घुले, संतोष दसवडकर, शिवाजी कोळी आदी उपस्थित होते.

पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील अनेक शाळा व महाविद्यालयांमध्ये मुला-मुलींनी फुटबॉल खेळण्याचा आनंद घेतला. त्याचप्रमाणे जिल्हा फुटबॉल संघटनेतर्फे ढोबरवाडी येथील मैदानावर प्रदर्शनीय सामन्याचेही आयोजन करण्यात आले.