करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या देशभरात चिंतेचं वातावरण आहे. परिस्थितीचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. यामुळे हातावर पोट असणाऱ्या रोजंदार मजुरांचं मोठं नुकसान होत आहे. केंद्र सरकारने सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करुन टाकल्यामुळे या मजुरांना आपल्या घराकडे जाण्याचा रस्ता बंद झाला आहे. दिल्ली शहरात बस स्थानकांवर काही दिवसांपूर्वी मजुरांनी आपल्या गावी जाण्यासाठी मोठ्या संखेने गर्दी केली होती. भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायुचंग भूतिया अशा मजुरांसाठी धावून आला आहे.

सिक्कीममधील लमुसे आणि ताडाँग या भागात भूतियाच्या मालकीच्या इमारती आहेत…सिक्कीममध्ये पश्चिम बंगाल-बिहार या राज्यातून अनेक मजूर कामासाठी येत असतात. अशा मजुरांसाठी भूतियाने आपली इमारत राहण्यासाठी दिली आहे.

भूतियाच्या इमारतीवर काम करणारे काही मजूरही लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर आपल्या गावाला जायला निघाले होते. मात्र भूतियाने स्थानिक प्रशासनाशी बोलत गंगटोकजवळ या मजूरांची राहण्याची सोय केली आहे. भारतात करोना बाधित रुग्णांचा आकडा आता १ हजाराच्या वर गेला आहे. सिक्कीममध्ये अद्याप करोनाचा एकही रुग्ण सापडला नसला तरीही खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाने राज्याच्या सीमा बंद केल्या आहेत. मजुरांच्या राहण्याची सोय केल्यानंतर बायुचंग भूतिया आपल्या फुटबॉल क्लबच्या माध्यमातून त्यांच्या अन्न-धान्याची सोय करत आहे.