गलवान खोऱ्यात भारत-चीन यांच्यातील सैन्यदलांमध्ये झालेल्या तणावामुळे देशभरात चिनी वस्तूंविरोधात वातावरण निर्माण झालं. या संघर्षात आतापर्यंत २० भारतीय जवानांना हौतात्म्य पत्करावं लागलं. यानंतर सोशल मीडियावर बीसीसीआयने VIVO या चिनी मोबाईल कंपनीची स्पॉन्सरशिप रद्द करावी असा दबाव वाढवण्यात आला. जनभावनेचा आदर करत बीसीसीआयनेही VIVO सोबतचा करार एका वर्षासाठी स्थगित करत तेराव्या हंगामासाठी नव्याने निवीदा मागवल्या. १८ ऑगस्टला Dream 11 या कंपनीने बाजी मारत २२२ कोटी रुपये मोजत स्पॉन्सरशिपचे हक्क विकत घेतले. Dream 11 कंपनी ही दोन भारतीयांनी स्थापन केलेली असली तरीही त्या कंपनीत Tencent या चिनी कंपनीची गुंतवणूक आहे. त्यामुळे Dream 11 ला स्पॉन्सरशिप देताना चीन विरोधाचं काय झालं असा सवाल सोशल मीडियावर विचारला जात आहे.

अवश्य वाचा – Dream 11 ची स्पॉन्सरशिप फक्त IPL 2020 पुरतीच – BCCI चा निर्णय

Money Control या वेबसाईटशी बोलत असताना बीसीसीआयमधील एका विश्वसनीय सूत्राने याप्रकरणी बीसीसीआयची बाजू स्पष्ट केली. “Dream 11 कंपनी ही बीसीसीआयच्या अधिकृत स्पॉन्सरपैकी एक कंपनी आहे. IPL स्पॉन्सरशिपच्या निमीत्ताने हे नातं अधिक घट्ट होणार आहे. तसेच Dream 11 ला देखील आयपीएलमुळे भारतात आपला फॅनबेस वाढवण्यासाठी मदत होणार आहे. Tencent या चिनी कंपनीची Dream 11 मध्ये नाममात्र गुंतवणूक आहे. (अंदाजे १० टक्क्यांच्या घरात) Dream 11 कंपनीचे सर्व कर्मचारी, त्यांची बाजारात असलेली डिजीटल उत्पादनं, तंत्रज्ञान हे सर्व भारतीय आहे. भारतीय लोक त्याचे मालक आहेत. त्यामुळे Dream 11 ही भारतीय कंपनीच आहे, त्यात परदेशी गुंतवणूकीचा मुद्दा फारसा मोठा नाही.”

अवश्य वाचा – Dream 11 सोबत दोन महत्वाच्या कंपन्यांचंही IPL 2020 ला अर्थसहाय्य

३१ डिसेंबर २०२० पर्यंत बीसीसीआय आणि Dream 11 यांच्यातला करार कायम राहणार आहे. सुरुवातीला बीसीसीआयने Dream 11 चा करार २०२२ पर्यंत जास्तीच्या बोलीवर वाढवण्याची तयारी दाखवली होती. परंतू VIVO च्या तुलनेत Dream 11 कडून मिळणारी रक्कम ही जवळपास निम्मी असल्यामुळे बीसीसीआयने Dream 11 सोबतचा करार या IPL 2020 पुरताच मर्यादीत ठेवला आहे. VIVO प्रत्येक हंगामासाठी बीसीसीआयला ४४० कोटी रुपये देत होतं.

अवश्य वाचा – जाणून घ्या IPL स्पॉन्सरशिपचे हक्क मिळवणाऱ्या Dream 11 कंपनीबद्दल…