महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०११ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत मुंबईच्या वानखेडे मैदानावर श्रीलंकेवर मात केली. प्रदीर्घ कालावधीनंतर भारताने आयसीसी विश्वचषकाचं विजेतेपद मिळवल्यामुळे सर्व भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण होता. या विजयानंतर सर्व खेळाडूंची सचिन तेंडुलकर आणि संघाचे तत्कालीन प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांना खांद्यावर घेत संपूर्ण मैदानात फिरवत त्यांची मिरवणूक काढली होती. मात्र कस्टर्न यांना भारतीय संघाचं प्रशिक्षकपद मिळण्यामागची कहाणी खूपच रोचक आहे. एका पॉडकास्टमध्ये बोलत असताना कर्स्टन यांनी फक्त ७ मिनीटांच्या इंटरव्ह्यूनंतर आपल्याला भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचं काम मिळाल्याचं सांगितलं.

प्रशिक्षक निवड समितीवर असलेल्या सुनिल गावसकर आणि रवी शास्त्री यांच्यामुळे आपल्याला हे काम मिळाल्याचं कर्स्टन यांनी सांगितलं. “सुनिल गावसकर यांनी मला इ-मेल करुन भारतीय संघाला प्रशिक्षण देण्याची जबाबदारी स्विकारणार का असं विचारलं. सुरुवातीला मला हा फसवाफसवीचा प्रकार वाटला. म्हणून मी त्याला उत्तरच दिलं नाही. दुसरा इ-मेल आल्यानंतर मी माझ्या पत्नीला याबद्दल सांगितलं, तेव्हा ती देखील म्हणाली की कदाचीत तुला चुकून इ-मेल आला असेल. यानंतर गावसकरांनी पुन्हा एकदा इ-मेल करत मला मुलाखतीसाठी येशील का असं विचारलं?? माझ्यासाठी हे सर्व आश्चर्यकारक होतं. कारण माझ्याकडे त्यावेळी प्रशिक्षण देण्याचा फारसा अनुभव नव्हता.”

“मी मुलाखतीसाठी भारतात पोहचल्यानंतर बीसीसीआयचे अधिकारी व इतर जणं बसले होते. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मला विचारलं, भारतीय संघासाठी तुमच्या डोक्यात काय कल्पना आहेत हे आम्हाला सांगा?? यावर मी थेट म्हणालो की माझ्या डोक्यात आता काहीही नाहीये, मला कोणीही कसलीही तयारी करुन यायला सांगितलेलं नव्हतं. यावेळी रवी शास्त्री यांनी मला विचारलं की तुम्ही भारतीय संघाला हरवण्यासाठी काय कराल?? माझ्यामते हा प्रश्न चर्चेला वाट करुन देण्यासाठी महत्वाचा ठरला. यानंतर मी माझ्या डोक्यातल्या २-३ कल्पना त्यांना सांगितल्या. यानंतर आमच्यात थोडावेळ चर्चा झाली. साधारण ७ मिनीटांमध्ये माझा इंटरव्ह्यू संपला आणि बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी माझ्यासमोर कराराची कागदपत्र सरकवली.” कर्स्टन आपला अनुभव सांगत होते.

“कराराची कागदपत्र तपासण्यासाठी मी उत्सुकतेने उभा राहिलो, पण मला त्यात माझं नाव कुठे दिसेना. पण त्या करारात मला भारताचे आधीचे प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांचं नाव होतं. मी अधिकाऱ्यांना ही बाब लक्षात आणून देताच त्यांनी लगेच पेनाने चॅपल यांचं नाव खोडून तिकडे माझं नाव लिहीलं.” ग्रेग चॅपल यांच्या काळात भारतीय संघाची कामगिरी अतिशय खालावली होती. त्यातच खेळाडू आणि प्रशिक्षकांमधले अनेक वाद समोर आल्यामुळे बीसीसीआयला अखेरीस नवीन प्रशिक्षकांचा शोध घ्यावा लागला. या सर्व नाट्यमय घडामोडींनंतर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची माळ कर्स्टन यांच्या गळ्यात पडली. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचं नाव आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठं करण्यात कर्स्टन यांचाही मोठा वाटा मानला जातो.