करोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात ३ मे पर्यंत लॉकडाउन वाढवलं आहे. या संपूर्ण काळात क्रीडा स्पर्धा रद्द असल्यामुळे भारतीय क्रिकेटपटू घरात राहून आपल्या परिवारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीने इन्स्टाग्रामवर लाईव्ह चॅटमध्ये युजवेंद्र चहलसोबत गप्पा मारल्या. या गप्पांमध्ये शमीने लॉकडाउनमध्ये अडकलेल्या एका कामगाराचा जीव कसा वाचवला याबद्दल सांगितलं.

“तो कामगार राजस्थानवरुन आला होता, आणि तू विचार करु शकतोस त्याला बिहारला जायचं होतं. लखनऊ ते बिहार मधलं अंतर किती आहे हे तुला माहिती आहे. सध्याच्या परिस्थितीत त्याच्याकडे प्रवासासाठी कोणतंही साधन उपलब्ध नव्हतं. नेमका माझ्या घरासमोर तो चक्कर येऊन पडला. माझ्या सीसीटीव्ही कॅमेरात हा प्रकार मला दिसला…मी तात्काळ त्याला घरात घेऊन पाणी आणि खायला दिलं, आणि त्याच्या पुढच्या प्रवासासाठी थोडी मदत केली.” मोहम्मद शमी युजवेंद्र चहलला आपल्या अनुभवाबद्दल सांगत होता.

यावेळी आपल्या परिसरात लॉकडाउनमुळे अडकलेल्या कामगारांनाही शमी मदत करतो आहे. माझ्या घरापासून महामार्ग अगदी जवळ आहे. त्यामुळे कामगारांना तिकडून प्रवास करत असताना मी पाहतो आहे. त्यांना जिवनावश्यक वस्तूंसाठी झगडताना मी पाहतो आहे. सध्याच्या घडीला मला जी शक्य होईल ती मदत मी करतोय, असं शमीने सांगितलं. लॉकडाउनमुळे संपूर्ण देशभरात राज्यांच्या सीमा बंद झालेल्या आहेत. यामुळे रोजंदारीवर इतर राज्यांत कामासाठी आलेल्या मजुरांची चांगलीच कोंडी झालेली आहे, काही भागात मजुर रस्त्यावर येत असल्यामुळे पोलिस यंत्रणेवरही दबाव येताना दिसतोय.