डॉ. प्रकाश परांजपे

बिनहुकुमी डावात खेळाची भवानी कशी करावी, सुरुवातीची उतारी कशी ठरवावी यावरचा लेख पिंकीने पण वाचला. दुसऱ्याच दिवशी मेनन उशिरा आल्यामुळे मंडळींनी पिंकीला दोन डावांपुरतं खेळायला बसवलं आणि मोठाच घोळ झाला. पहिलाच डाव काहीसा जुन्या लेखात दिलेल्या डावाप्रमाणेच आला. वरील चित्रात दाखविल्याप्रमाणे बोली दिल्या गेल्या. मात्र या डावात उ-द जोडी ४ बदामच्या ठेक्यापर्यंत पोचली कारण दोन्ही खेळाडूंकडे ४-४ बदामाची पानं होती.

भातखंडे आणि आबा उतारी कशी निवडावी यावर तिला सूचना देत होते. पण त्याकडे कानाडोळा करत पिंकीने तिच्याकडे असलेल्या लांबलचक पंथातील चौथ्या मोठय़ा पानाची म्हणजे इस्पिक पंजीची उतारी केली. आबांनी पहिला दस्त इस्पिक गुलामाने जिंकून तीन फेऱ्यांत गावातले हुकूम काढून टाकले आणि मग किलवरचे चार दस्त वाजवून बघ्याच्या हातातल्या चौथ्या किलवरवर हातातलं चौकटचं एक खाटं पान जाळलं. प-पू जोडीला दोन चौकटचे आणि एक इस्पिकचा असे तीन दस्त मिळाले, पण हातातलं तिसरं इस्पिकचं पान आबांनी छोटूच्या हातातल्या हुकुमाने मारून घेतलं आणि एकूण १० दस्त बनवून ठेका वटवला.

पिंकीची अवस्था सांगकाम्या बाळूप्रमाणे झाली होती. बिनहुकुमी डावाचा ठोकताळा तिने हुकुमी डावात वापरला होता. बिनहुकुमी डावात खेळाच्या शेवटी मोठी पानं पडून गेल्यानंतर लांब पंथातील छोटय़ा पानांना दस्त मिळू शकतात, पण हुकुमी डावात बचावपक्षाच्या छोटय़ा पानांना क्वचितच असं स्वातंत्र्य मिळतं. आपल्या मोठय़ा पानांचे दस्त वेळेतच करून घेणे, जमल्यास ठेकेदाराच्या हातात कारभार जाण्याआधीच एखाद्या पंथात मारती मिळत असेल तर ती मिळवणे, आणि ठेकेदाराला सहजासहजी आपल्या मोठय़ा पानांना गिळंकृत करत येणार नाही, याची काळजी घेणे अशा वेगवेगळ्या प्रकारे बचावपक्षाला आपला किल्ला लढवावा लागतो. हुकुमी डावात जोडीने असलेली चित्रं बचावपक्षाला उतारीच्या दृष्टीने जास्त उपयोगाची आहेत. या अनुषंगाने चौकट राणीची भवानीची उतारी ही या डावात सर्वार्थाने योग्य उतारी आहे, बचावपक्षाच्या भल्याची आहे.

मारतीच्या दृष्टीने प्रयत्न करायचा असेल तर किलवरची उतारी विचारात घेण्याजोगी आहे, परंतु या डावात पिंकीकडे इस्पिक एक्का-राणी आणि चौकट राणी-गुलाम असे नऊ चित्रगुण आहेत आणि उ-द जोडीने लिलावाच्या दरम्यान कमीत कमी १२+१२=२४ चित्रगुण दाखवलेले असल्यामुळे पूर्वेकडे किलवर एक्का-राजा असणं दुरापास्त आहे. एकदा का ठेकेदाराला हातात उतारी मिळाली की तो गावातले हुकूम नक्कीच काढणार. मग किलवरची मारती मिळणं शक्य नाही, त्यामुळे किलवरची उतारी लागू पडण्याची शक्यता कमी आहे. चौकट राणीच्या उतारीच्या सुदैवाने या डावात उत्तरेकडे चौकट राजा आहे आणि पूर्वेचा एक्का त्याच्या डोक्यावर बसलेला आहे त्यामुळे चौकटचे तीन आणि इस्पिकचे दोन असे पाच दस्त मिळून ठेका सुरुवातीलाच बुडवता येतोय. अर्थातच हा नशिबाचा भाग आहे, प्रत्येक डावात अशी क्षिप्रसिद्धी  मिळेलच असं नाही. वेगवेगळ्या शक्यतांचा विचार करून योग्य ती उतारी निवडणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं.

panja@demicoma.com

(आंतरराष्ट्रीय ब्रिजतज्ज्ञ, लेखक, समालोचक, खेळाडू, प्रशिक्षक)