डॉ. प्रकाश परांजपे

‘‘आबा, तुम्हाला दातार  ठाऊक आहे का?’’

‘‘चांगलाच ठाऊक आहे छोटू. बाळू उकिडवे आणि कांता दातार म्हणजे भारतातली प्रसिद्ध जोडी. १९८३ साली मॉरिशसमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं त्यांनी. मी बघितलंय त्यांना खेळताना डोंबिवलीच्या स्पर्धामध्ये. काय बचाव भारी होता त्यांचा, ठेकेदारांना भंडावून सोडायचे,’’ असं म्हणत आबांनी एका बोर्डामधून पत्ते बाहेर काढले आणि डाव लावून छोटूसमोर ठेवला.

दक्षिणेनं डाव वाटून एक किलवरची बोली दिली. उत्तरेनं १ इस्पिक बोलून ९-११ चित्रगुण दाखवले. दक्षिणेकडे चौकट-किलवरमध्ये ६-५ अशी पानं होती. त्या पंथांना उत्तरेच्या हातात फारसा पाठिंबा नव्हता; पण दक्षिणेने नेटाने गाडी ५ चौकटच्या शतकी ठेक्यापर्यंत पोहोचवली. तसं म्हटलं तर ३ बिहू ठेका खेळणं जास्त सोपं पडलं असतं, पण दक्षिणेला तो प्रस्ताव फारसा आवडला नाही. असो.

बाळू उकिडवेंनी बदाम गुलामाची उतारी केली. ठेकेदार दक्षिण त्यावर राजा खेळला आणि कांताने एक्क्याने तो दस्त जिंकला. आता इस्पिक एक्का वाजवून घेतला नाही तर बदाम राणीवर दक्षिणेच्या हातातलं इस्पिकचं पान जाळलं जाऊन इस्पिक एक्का ‘झोपी’ जाण्याची भीती होती. त्यामुळे कांताने इस्पिक एक्का दुसऱ्या दस्ताला वाजवून घेतला. सुदैवाने दक्षिणेकडे एक इस्पिकचं पान होतं. जर दक्षिणेकडे ०-२-६-५ अशी इस्पिक-बदाम-चौकट-किलवर पानांची विभागणी असती तर इस्पिक एक्क्याची खैर नव्हती, पण इस्पिक एक्का तगला.

आता प्रश्न होता तिसरा दस्त कसा मिळवायचा. किलवर एक्का-राणी आणि चौकट एक्का-राजा नक्कीच दक्षिणेकडे असणार कारण त्यांनी १२-१४ चित्रगुण दाखवले होते. जर ठेकेदाराला बघ्याच्या हातात थारा मिळाला तर तो एक किलवरचं पान खेळून किलवर राजाला बगल देऊन एक्का-राणीचे दोन दस्त करणार, मग एक किलवर बघ्याच्या हातात मारून घेणार आणि मग चौकट खेळून पूर्वेच्या राणीला कचाटय़ात पकडून सगळे दस्त बनवणार हे विधिलिखित स्पष्ट दिसत होतं. कांता इस्पिक किंवा बदाम खेळला असता तर डावाचा पुढचा खेळ तसा झाला असता. किलवर किंवा छोटं चौकट खेळूनही भागण्यासारखं नव्हतं. किलवरवर दक्षिण राणी खेळला असता, राजा त्याला आयताच बगलेत घेता आला असता.

कांताने बचावासाठी एक नामी युक्ती शोधली. तिसऱ्या दस्ताला त्याने चक्क चौकटची राणी पटावर ठेवली. दक्षिण खूश झाला. त्याने चौकट एक्का जिंकला, आणि चौकट गुलाम खेळून बघ्याच्या हातात जाऊन इस्पिक राजा, बदाम राणी वाजवून त्यावर दोन किलवरची पाने हातातून जाळली. त्यानंतर बघ्याच्या हातातून  किलवर खेळून राजाला बगलेत घेऊन किलवर राणीचा दस्त बनवला. तरीही अजून किलवर एक्का-गुलाम त्याच्या हातात उरले होते, बघ्याच्या हातातले हुकूम संपले होते, कारण बघ्याच्या हातात थारा मिळण्याकरता त्याला चौकट गुलाम वापरावा लागला होता आणि आता पुन्हा बघ्याच्या हातात थारा मिळणं दुरापास्त होतं. शेवटी नाइलाजाने त्याला एक दस्त कांताच्या किलवर राजाला द्यावा लागला. ठेका एका दस्ताने बुडाला.

‘‘आबा, हार्वर्ड विद्यापीठाने श्रीकांत दातार यांची डीन म्हणून नियुक्ती केल्याची बातमी आहे आज. त्याबद्दल सांगत होतो मी तुम्हाला, ब्रिज खेळाडूंबद्दल नाही,’’ छोटूनं खुलासा केला.

panja@demicoma.com

(आंतरराष्ट्रीय ब्रिजतज्ज्ञ, लेखक, समालोचक, खेळाडू, प्रशिक्षक)