कायम आणि तात्पुरता निवासाचा पत्ता भिन्न असल्याच्या आधारे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला असला तरी दोन वर्षांपूर्वी विलासराव देशमुख यांनी कायम आणि तात्पुरते दोन वेगवेगळ्या सादर केलेल्या पत्त्यांवर आक्षेप घेण्यात येऊनही तो अर्ज मात्र वैध ठरविण्यात आला होता.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या घटनेनुसार मुंबई, नवी मुंबई किंवा ठाणे जिल्ह्याचा कायमस्वरूपी रहिवासी असणाऱ्यांनाच संघटनेची निवडणूक लढविण्यास पात्र ठरविले जाते. जुलै २०११ मध्ये झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विलासराव देशमुख यांचा अर्ज वैध ठरविण्यात आला होता. विलासराव देशमुख आणि मुंडे यांचे वरळीत निवासस्थान एकाच इमारतीत आहे. विलासरावांचा अर्ज वैध ठरविताना ते १९८८ पासून मुंबईत राहतात, हा त्यांचा युक्तिवाद मान्य झाला होता. तसेच देशमुख यांनी पारपत्र, वीज बील यांसह आणखी काही कागदपत्रे सादर केली होती. तसेच कागदपत्रांचा संच आपणही सादर केला होता. पण विलासरावांना तेव्हा एक न्याय आणि मला मात्र वेगळा न्याय देण्यात आला, असा आरोप मुंडे यांनी केला.
विलासराव देशमुख यांच्या निवासाच्या मुद्दय़ावर तेव्हा नदीम मेमन यांनी आक्षेप घेतला होता. मेमन यांचा दावा फेटाळून लावणाऱ्या मुंबई क्रिकेटच्या आदेशात निवासाचा मुद्दा लवचिक असल्याचे नमूद करण्यात आले होते. विलासरावांचे मूळ निवास लातूर जिल्ह्यातील बाभळगाव असले तरी त्यांच्या निवासाचा जास्त काळ मुंबईत असल्याचा युक्तिवाद मान्य करण्यात आला होता. मुंडे यांनी याच मुद्दय़ावर युक्तिवाद केला होता. मात्र मुंडे यांचा हा दावा अमान्य करताना मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रवी सावंत यांनी, विलासरावांच्या विरोधातील आक्षेप हा अर्जाच्या छाननीच्या वेळी घेण्यात आला नव्हता, याकडे लक्ष वेधले.
शरद पवार यांनीही यापूर्वी मूळ निवासाचा पत्ता बारामतीचा दिला होता, हा आक्षेप मुंडे यांनी घेतला होता. पवार यांनी १९ जून २०१३ रोजी मतदार म्हणून मलबार हिल मतदारसंघात नोंदणी केली आहे. यामुळे पवार आता मुंबईचे कायमस्वरूपी निवासी झाल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.