सलामीलाच धक्का बसल्याने बाद फेरीतील स्थान धोक्यात

थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यातच फ्रान्सकडून ४-१ असा पराभव पत्करल्यामुळे भारताच्या बाद फेरीतील प्रवेशाच्या आशा डळमळीत झाल्या आहेत.

जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेला एच. एस. प्रणॉय आणि मिश्र जोडी मनू अत्री आणि बी. सुमीत रेड्डी यांच्या अनुपस्थितीचा फटका भारताला बसला. या दोघांच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या अननुभवी भारतीय खेळाडूंकडून प्रभावी कामगिरी होऊ शकली नाही. या स्पर्धेमध्ये फ्रान्सविरुद्धच्या प्रारंभाच्या लढतीत जागतिक क्रमवारीत १८व्या स्थानावर असलेल्या बी. साईप्रणीतने भारताला २१-७, २१-१८ असा विजयी प्रारंभ करून  दिला. त्यानंतरच्या दुहेरीच्या लढतीत भारताच्या अर्जुन एम.आर. आणि रामचंद्रन श्लोक यांना बॅस्टीयन केरसाऊडी आणि ज्युलियन माइओ यांनी १३-२१, १६-२१ असे पराभूत केले.

तिसऱ्या सामन्यात जागतिक क्रमवारीत २१व्या स्थानावर असलेल्या समीर वर्माचा सामना ४३व्या स्थानावर असलेल्या ल्युकास कोरवीशी झाला. त्यात समीरला १८-२१, २२-२०, १८-२१ असा पराभव पत्करावा लागल्याने भारत २-१ असा पिछाडीवर पडला. त्यानंतर दुहेरीच्या दुसऱ्या सामन्यात जागतिक क्रमवारीत ७०व्या स्थानी असलेल्या अरुण जॉर्ज आणि सन्याम शुक्लाला १०३व्या क्रमांकावरील थॉम जिक्वेल आणि रोनान लाबर यांनी १०-२१, १२-२१ असे पराभूत केले. त्यामुळे फ्रान्सने ३-१ अशी विजयी आघाडी घेतली. अखेरच्या एकेरी सामन्यात भारताच्या लक्ष्य सेनने टोमा ज्युनिअर पोपोवला चांगली लढत दिली, परंतु ही लढतदेखील २०-२२, २१-१९ आणि १९-२१ अशी गमावल्याने भारताला ४-१ असा मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. भारतीय संघाचा सोमवारी ऑस्ट्रेलियाशी सामना होणार आहे.

आजचा सामना

  • पुरुष : भारत वि. ऑस्ट्रेलिया
  • वेळ : सायंकाळी ५.३० वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस २