एकेरीत साईप्रणीत आणि दुहेरीत मनू-सुमित यांचे आव्हान संपुष्टात

ऑकलंड : न्यूझीलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारताच्या बिगरमानांकित एच. एस. प्रणॉयने इंडोनेशियाच्या द्वितीय मानांकित टॉमी सुगिआर्तोला सलग दोन गेममध्ये पराभूत केले. प्रणॉयने या विजयासह सर्वानाच चकीत करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. मात्र भारताच्या बी. साईप्रणीतचे आव्हान दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आले.

प्रणॉयने अफलातून खेळाचे प्रदर्शन घडवत सुगिआर्तोला २१-१४, २१-१२ असे अवघ्या ३७ मिनिटांत पराभूत करीत मोठा धक्का दिला. जागतिक क्रमवारीत १३व्या स्थानी असलेल्या सुगिआर्तो आणि २६व्या स्थानी असलेल्या प्रणॉय यांच्यात कारकीर्दीतील ही पहिलीच लढत होती. या सामन्यात प्रणॉयने पहिल्या गेममध्ये प्रारंभी ७-३ आणि नंतर ११-४ अशी आघाडी वाढवत नेत विजय मिळवला. दुसऱ्या गेममध्ये सुगिआर्तोने ४-२ अशी घेतलेली आघाडी मोडून काढत प्रणॉयने ८-४ अशी आघाडी मिळवली. त्यानंतर दुसरा गेमदेखील मोठय़ा फरकासह प्रणॉयने जिंकला. पुढील फेरीत त्याला जपानच्या कांटा त्स्युनेयमाशी झुंजावे लागणार आहे.

त्याआधी, चीनचा महान बॅडमिंटनपटू लिन डॅनकडून भारताच्या बी. साईप्रणीतला पराभव पत्करावा लागला. डॅनने हा सामना २१-१२, २१-१२ असा जिंकला. त्याला पुढील फेरीत इंडोनेशियाच्या अव्वल मानांकित अ‍ॅन्थनी सिनिसुका गिंटिंगशी लढत द्यावी लागणार आहे. पुरुष दुहेरीत मलेशियाच्या गोह शेम आणि टॅन वी किओंग या जोडीकडून भारताच्या मनू अत्री आणि सुमित बी. रेड्डी या जोडीला २१-१७, २१-१९ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव स्वीकारावा लागला.