रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यासाठी भारतीय बॅडमिंटनपटूंमध्ये चुरशीची लढाई आहे. एकामागोमाग सहकारी गाशा गुंडाळत असतानाही प्रणॉयने शानदार खेळासह स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला. अंतिम लढतीत १३व्या मानांकित प्रणॉयने जर्मनीच्या मार्क झ्वाइबलरला २१-१८, २१-१५ असे नमवले. झंझावाती स्मॅशेस, नेटजवळून सुरेख खेळ आणि सर्वागीण वावर हे प्रणॉयच्या विजयाचे वैशिष्टय़ ठरले. गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त असल्यामुळे झ्वाइबरला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. या जेतेपदासह प्रणॉय जागतिक क्रमवारीत अव्वल वीस खेळाडूंमध्ये स्थान पटकावण्याची शक्यता आहे. त्यामुळे किदम्बी श्रीकांत, पारुपल्ली कश्यप, अजय जयराम, बी. साईप्रणीत यांच्याबरोबरीने रिओवारीसाठी सज्ज असल्याचे प्रणॉयने सिद्ध केले.
२०१४ मध्ये प्रणॉयने इंडोनेशियन मास्टर्स आणि टाटा खुल्या स्पर्धेच्या जेतेपदांची कमाई केली होती. मात्र त्यानंतर दुखापतींनी सतावल्यामुळे त्याच्या कामगिरीत घसरण झाली होती. यंदाच्या वर्षांतले पहिलेवहिले जेतेपद पटकावत प्रणॉयने ऑलिम्पिकसाठी तय्यार असल्याचे दाखवून दिले आहे.पुढच्या आठवडय़ात इंडियन ओपन तसेच मलेशिया स्पर्धेत प्रणॉय सहभागी होणार आहे.

जेतेपद पटकावल्याने प्रचंड आनंद झाला आहे. जेतेपदामुळे जागतिक क्रमवारीत अव्वल वीस खेळाडूंत स्थान मिळवेन. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू आहेत
एच.एस. प्रणॉय