भारताच्या एच.एस. प्रणॉयची ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील अनपेक्षित विजयाची मालिका शनिवारी संपुष्टात आली. संघर्षपूर्ण लढतीत त्याला चीनच्या हुआंग युक्सियांगने २०-२२, २१-१६, २३-२१ असे पराभूत केले.

पायाच्या दुखापतीमधून तंदुरुस्त झाल्यानंतर प्रणॉयची ही पहिलीच मोठी स्पर्धा होती. पहिल्या गेममध्ये ७-१२ अशा पिछाडीवरून परतीचे सुरेख फटके मारत प्रणॉयने १५-१२ अशी आघाडी मिळवली. परंतु हुआंगने १६-१६ अशी बरोबरी साधली. त्याने २०-१८ अशी आघाडीही मिळवली. पण जिद्दीने खेळ करीत प्रणॉयने हा गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सुरुवातीपासूनच बरोबरी होती. हुआंगने ११-१० अशी आघाडी मिळवली. ही आघाडी त्याने १५-१२ अशी वाढवली. प्रणॉयने चिवट झुंज देत ही आघाडी केवळ एक गुणावर आणली. मात्र हुआंगने स्मॅशिंगच्या जोरकस फटक्यांचा उपयोग करीत हा गेम जिंकत सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली.

तिसऱ्या गेमबाबत कमालीची उत्कंठा वाढली. प्रणॉयने १०-३ अशी आघाडी घेतल्यामुळे सामन्याचे पारडे त्याच्या बाजूने झुकले गेले. हुआंगने संयमपूर्ण खेळ करीत त्याची आघाडी कमी केली. प्रणॉयने केलेल्या चुकांचाही त्याला फायदा झाला. १९-१९ अशा बरोबरीनंतर हुआंगने परतीच्या फटक्यांवर नियंत्रण ठेवत हा गेम व सामना जिंकला.

मी शंभर टक्के तंदुरुस्त नव्हतो. त्यामुळे तिसऱ्या गेमच्या वेळी मी अपेक्षेइतक्या वेगवान चाली करू शकलो नाही. माझ्यासाठी उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल हीदेखील चांगली कामगिरी आहे. या अनुभवाच्या जोरावर राष्ट्रकुल स्पर्धेत विजेतेपद मिळवण्यासाठी मी प्रयत्न करीन.

– एच. एस. प्रणॉय