पी.व्ही. सिंधू, एच. एस. प्रणॉय यांच्यासह ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांनी चीन मास्टर्स ग्रां.प्रि. बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली. चौथ्या मानांकित सिंधूने तैपेईच्या चिइन ह्य़ुई युवर २१-९, २१-१७ असा विजय मिळवला.
दुखापती आणि सातत्याच्या अभावामुळे सिंधूला यंदाच्या हंगामात लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मात्र गुरुवारी झालेल्या लढतीत सिंधूने दमदार वर्चस्वासह खेळ करताना सहज विजय मिळवला. सातव्या मानांकित प्रणॉयने मलेशियाच्या डॅरेन लियूवर २१-१०, २१-१५ अशी मात
केली.
रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र होण्यासाठी निर्धारित कालावधीपर्यंत जागतिक क्रमवारीत अव्वल १६ खेळाडूंमध्ये स्थान राखण्यासाठी भारतीय पुरुष बॅडमिंटनपटूंमध्ये कमालाची चुरस आहे. प्रणॉयने या विजयासह ध्येयाच्या दिशेने मजबूत पाऊल टाकले आहे.
अनुभवी ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा जोडीने सेइह पेइ चेन आणि वू ती जुंग जोडीला २१-१२, २१-१२ असे नमवले. चीनच्या वांग यिलयू आणि झांग वेन जोडीने प्रणव चोप्रा आणि अक्षय देवलकर जोडीचे आव्हान २१-१७, २१-१८ असे संपुष्टात आणले.