फिलिप हय़ुजेसच्या अपघाती मृत्यूचा क्रिकेटजगताला तीव्र धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनाही या घटनेने हादरवले आहे; परंतु भारताविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत देशातील वेगवान गोलंदाजांना आखूड टप्प्याचे चेंडू टाकणे अवघड जाईल, असे मत चॅपेल यांनी व्यक्त केले आहे.
‘‘आखूड टप्प्याचे चेंडू टाकताना वेगवान गोलंदाजांवर त्या घटनेचा प्रभाव असेल. या घटनेचा भारताच्या वेगवान गोलंदाजांपेक्षा ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर तीव्र परिणाम झाला आहे. उसळता चेंडू हे ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्याचे महत्त्वाचे अस्त्र आहे. सध्याच्या परिस्थितीत कोणताही गोलंदाज ते फलंदाजावर सावधतेने टाकेल,’’ असे चॅपेल यांनी सांगितले.