भारताची ग्रॅँडमास्टर कोनेरू हम्पीने केर्न्‍स चषक बुद्धिबळ स्पर्धेच्या आठव्या फेरीत रशियाच्या वॅलेंटिना गुनिनाचा पराभव करत एकटीने आघाडी मिळवली आहे. हम्पीला ही स्पर्धा जिंकण्याची संधी असून अखेरच्या फेरीत तिची गाठ भारताच्याच द्रोणावल्ली हरिकाशी होणार आहे. अर्थातच विजय मिळवल्यास हम्पी विजेतेपदावर शिक्कामोर्तब करेल.

हम्पीचे ५.५ गुण झाले आहेत. अर्थातच विजेतेपदाच्या शर्यतीत हम्पीसमोर रशियाच्या अलेक्झांड्रा कोस्टेनियूकचे आव्हान असेल. कोस्टेनियूकने जॉर्जियाच्या नॅना झॅगनिड्झेचा पराभव करत पाच गुण मिळवले आहेत. हम्पीने गुनिनाविरुद्धच्या डावात सेमीस्लाव पद्धतीचा अवलंब केला आणि ३५ चालींत विजय नोंदवला. हम्पीचा हा स्पर्धेतील चौथा विजय ठरला. द्रोणावल्ली हरिकाला मात्र सलग तिसरी फेरी बरोबरीत सोडवावी लागली.

हरिकाला आठव्या फेरीत माजी विश्वविजेती मारिया मुझिचूकने बरोबरीत रोखले. हरिका चार गुणांसह संयुक्तपणे पाचव्या स्थानी आहे.

अन्य लढतींमध्ये १६ वर्षीय अमेरिकेच्या कॅरिसा यिपने विश्वविजेती वेंजून जू हिला ६१ चालींमध्ये पराभवाचा धक्का दिला. कॅरिसाचे ३.५ गुण झाले आहेत. स्पर्धेत सुरुवातीला चार पराभव स्वीकारल्यानंतर कॅरिसाने तीन विजयांची नोंद केली.