भारताची अग्रगण्य महिला बुद्धिबळपटू कोनेरू हंपी हिने ताश्कंद ग्रां. प्रि. बुद्धिबळ स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली आहे. या स्पर्धेतील एकूण अकरा फे ऱ्यांमध्ये तिने आठ गुणांची कमाई करत विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेमध्ये भारताच्या हंपी व द्रोणावली हरिका यांनी भाग घेतला होता. हंपी हिने अकराव्या फेरीत रशियाची अव्वल दर्जाची ग्रँडमास्टर ओल्गा गिरेआ हिला बरोबरीत रोखले. शेवटच्या फेरीत हरिका हिला चीनच्या झाओ झुई हिच्याकडून पराभव स्वीकारावा लागला, त्यामुळे हरिकाला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तिचे साडेसहा गुण झाले.
जॉर्जियाची बेला खोतेनाश्वेली व युक्रेनची कॅटरिना लॅग्नो यांचे प्रत्येकी सात गुण झाले. माध्यम गुणांच्या आधारे त्यांना अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान मिळाले. झाओ झुई हिने चौथा क्रमांक मिळविला.
हंपी या २६ वर्षीय खेळाडूला ‘पद्मश्री’ किताब मिळाला आहे. तिने २००१ मध्ये कनिष्ठ गटाच्या जागतिक स्पर्धेत अजिंक्यपद मिळविले आहे. २०११ मध्ये जगज्जेतेपदाच्या लढतीत तिला चीनची होऊ यिफानविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता.
हे विजेतेपद मला अतिशय सुखकारक आहे. या स्पर्धेत माझा खेळ अपेक्षेइतका चांगला झाला. स्पर्धेत विजेतेपद मिळविण्याची खात्री नव्हती; मात्र अव्वल यश मिळविण्याबाबत मी आशावादी होते. माझे हे यश भारतामधील महिलांनी बुद्धिबळात केलेल्या प्रगतीचे द्योतक आहे. अशीच कामगिरी पुढे सुरू ठेवण्याचा माझा प्रयत्न राहील.