हंगेरी व रुमानिया यांच्यातील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीचा सामना २२ मार्च रोजी प्रेक्षकांविनाच घेण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने (फिफा) घेतला आहे. हंगेरी व इस्रायल यांच्यातील सामन्यावेळी वर्णद्वेषी घटना झाल्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला.
फिफाने पत्रकाद्वारे ही माहिती दिली. इस्रायलविरुद्धच्या लढतीवेळी हंगेरीच्या पाठिराख्यांनी जातिवाचक शब्द उच्चारत इस्रायलच्या खेळाडूंना डिवचण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या पाठिराख्यांनी इस्रायलविरोधी प्रक्षोभक खाणाखुणाही केल्या. हंगेरीच्या फुटबॉल महासंघाने या घटनेबद्दल दिलगिरीही व्यक्त केली. तथापि या घटनेची गांभीर्याने दखल घेत फिफाने हंगेरी महासंघावर ३३ हजार युरो दंड ठोठावला आहे. तसेच हंगेरी व रुमानिया यांच्यातील आगामी लढतीस प्रेक्षकांना उपस्थित राहण्यास मनाई करण्यात आली आहे. हंगेरी महासंघाने ही कारवाई अतिशय कठोर असल्याचे मत व्यक्त केले आहे. बल्गेरिया व माल्टा यांच्यात २२ मार्च रोजी होणारा सामनाही प्रेक्षकांविना घेण्याचा निर्णय फिफाने घेतला आहे. बल्गेरिया व डेन्मार्क यांच्यात ऑक्टोबरमध्ये झालेल्या लढतीवेळी बल्गेरियाच्या काही प्रेक्षकांनी डेन्मार्कचा खेळाडू पॅट्रिक एमटिलिगा याला जातिवाचक शब्द उच्चारले होते.