अचंता शरथ कमल आणि जी. साथियान या भारताच्या पुरुष दुहेरी जोडीला ‘आयटीटीएफ’ जागतिक हंगेरी खुल्या टेबल टेनिस स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

शरथ-साथियान जोडीला अंतिम फेरीत जर्मनीचा बेनेडिक्ट डुडा आणि पॅट्रिक फ्रँझिस्का या जोडीकडून ५-११, ९-११, ११-८, ९-११ असा पराभव पत्करावा लागला. शरथ कमाल याचे या स्पर्धेतील हे दुसरे पदक ठरले. याआधी त्याने या स्पर्धेत मिश्र दुहेरीत मनिका बात्रासह कांस्यपदक मिळवले होते.

शरथ-साथियान जोडीने उपांत्य फेरीत हाँगकाँगच्या अव्वल मानांकित जोडीला पराभूत केले होते. मात्र अंतिम फेरीत जर्मनीच्या जोडीकडून त्यांना हार मानावी लागली.

१० वर्षीय हन्सिनीला कांस्यपदक : भारताच्या टेबल टेनिसमधून सर्वात जास्त लक्ष वेधून घेतले ते चेन्नईच्या हन्सिनी हिने. १० वर्षांची पाचवी इयत्तेमधील विद्यार्थिनी माथन राजन हन्सिनी हिने स्वीडनमधील ऑरेब्रो येथील स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. हन्सिनीचा उपकनिष्ठ मुलींच्या गटातील उपांत्य फेरीत रशियाच्या लुलिया पुगोवकिनाकडून १२-१०, ९-११, ५-११, ८-११ पराभव झाला. मात्र उपांत्य फेरी गाठल्याने हन्सिनीला कांस्यपदक मिळवता आले.