ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मायकल हसीने हार्दिक पांड्याला मेलबर्न येथे खेळवण्यात येणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात हार्दिक पांड्याला संघात संधी देण्याचा सल्ला दिलेला आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यांच्या खेळपट्टीपेक्षा मेलबर्नची खेळपट्टी वेगळी असणार आहे. त्यामुळे या खेळपट्टीवर अष्टपैलू हार्दिकला खेळवणं भारतासाठी फायद्याचं ठरु शकतं. २६ डिसेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे.

“पर्थ आणि मेलबर्नच्या खेळपट्ट्या या भिन्न प्रकारच्या आहेत. आतापर्यंतच्या मालिकेत भारतीय गोलंदाजांनी सुरेख मारा केला आहे. पर्थमधलं तापमान हे उष्ण असतं, तरीही भारतीय गोलंदाजांनी तिकडे भरपूर षटकं टाकली. हार्दिक पांड्या हा ऑस्ट्रेलियाच्या मिचेल मार्शसारखा आहे. ज्यावेळी तो फॉर्मात असतो तेव्हा त्याचा अतिरीक्त गोलंदाज म्हणून तुम्हाला वापर करता येतो. यामुळे प्रमुख गोलंदाजांवरचा ताणही हलका होतो. याच कारणासाठी भारताने तिसऱ्या कसोटीसाठी हार्दिक पांड्याला संघात संधी द्यायला हरकत नाही.” हसी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने पहिली कसोटी जिंकत मोठ्या दणक्यात सुरुवात केली होती. यानंतर पर्थ कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. भारतासाठी फलंदाजीमध्ये विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेचा अपवाद वगळता इतर फलंदाजांचं अपयश हा मोठा चिंतेचा विषय ठरतो आहे. त्यामुळे आगामी सामन्यात भारतीय संघ कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – विराटने आपली आक्रमकता कायम टिकवावी – झहीर खान