कोलकात्यावर २२ धावांनी मात; ‘क्वालिफायर-२’मध्ये गुजरातशी सामना
दोन्ही साखळी सामन्यांमध्ये ज्या संघाकडून पराभव पत्करावा लागला त्याच संघाला ‘एलिमिनेटर’मध्ये चीतपट करत सनरायझर्स हैदराबादने २२ धावांनी दिमाखदार विजय मिळवला. युवराज सिंगच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना १६२ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताला हैदराबादची भेदक गोलंदाजी आणि संथ खेळपट्टीमुळे १४० धावाच करता आल्या. या सामन्यात ३१ धावांची उपयुक्त खेळी आणि दोन बळी, अशी अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या मोइसेस हेनरिक्सला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हैदराबादचा आता शुक्रवारी दुसऱ्या ‘क्लालिफायर’मध्ये गुजरात लायन्सशी सामना होणार आहे.
कोलकाताने नाणेफेक जिंकून हैदराबादला फलंदाजीसाठी पाचारण केले. खेळपट्टीचा पोत पाहता यावर धावांचा डोंगर उभा राहणे कठिण होते. डेव्हिड वॉर्नरसराख्या धडाकेबाज फलंदाजालाही २८ धावा करण्यासाठी तेवढेच चेंडू खर्ची घालावे लागले. कोलकाताचा फिरकीपटू कुलदीप यादवने यावेळी भेदक मारा करत हैदराबादच्या धावसंख्येला खीळ बसवण्याचा प्रयत्न केला. यादवने वॉर्नरसह, हेनरिक्स आणि बेन कटींग या तीन फलंदाजांना बाद करत हैदराबादचे कंरबडे मोडले. हैदराबादला आता मोठी धावसंख्या उभारता येणार नाही, असे वाटत होते. पण त्यावेळी युवराज सिंग मैदानात जम बसवत होता. या सामन्यात युवराज बऱ्याच महिन्यांनी पुन्हा एकदा आपल्या जुन्या रंगात दिसला. दहाव्या षटकात हैदराबादची ३ बाद ७१ अशी स्थिती होती, तेव्हा युवराज मैदानात आला. सुरुवातीला त्याने संयत फलंदाजी केली, पण स्थिरस्थावर झाल्यावर मात्र त्याने चांगली फटकेबाजी केली. युवराजने ३० चेंडूंमध्ये आठ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ४४ धावांची खेळी साकारत संघाची धावसंख्या दिडशेच्या जवळ आणली. अखेरच्या षटकांमध्ये बिपुल शर्माने सहा चेंडूंत दोन षटकारांच्या मदतीने नाबाद १४ धावा केल्या आणि हैदराबादने २० षटकांमध्ये १६२ अशी सन्मानजनक धावसंख्या उभारली.
हैदराबादचे आव्हान माफक वाटत असले तरी खेळपट्टीचा नूर पाहता ते कोलकातासाठी सोपे नव्हतेच. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी कोलकाताच्या फलंदाजांनी खेळपट्टीवर पाय रोवून उभे राहण्याची गरज होती, पण कोलाकाताच्या एकाही फलंदाजाला ते जमले नाही. कर्णधार गौतम गंभीर (२८) सुदैवी ठरला असला तरी त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. मनीष पांडेने अखेरच्या षटकांमध्ये मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्याची ही खेळी विजयासाठी तोकडी पडली. पांडेने २८ चेंडूंत २ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३६ धावा केल्या. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारने भेदक मारा करत १९ धावांत ३ बळी मिळवले.
संक्षिप्त धावफलक
सनरायझर्स हैदराबाद : २० षटकांत ८ बाद १६२ (युवराज सिंग ४४ मोइसेस हेनरिक्स ३१; कुलदीप यादव ३/३५) विजयी वि. कोलकाता नाइट रायडर्स : २० षटकांत ८ बाद १४० (मनीष पांडे ३६; भुवनेश्वर कुमार ३/१९, मोइसेस हेनरिक्स २/१७).
सामनावीर : मोइसेस हेनरिक्स .