इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट

आज रंगणाऱ्या ‘एलिमिनेटर’ सामन्यातील पराभूत संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात

अंतिम फेरीचा मार्ग ‘एलिमिनेटर’ सामन्यातील दोन्ही संघांसाठी खडतर आहे. परंतु इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या आतापर्यंतच्या वाटचालीत दिल्ली कॅपिटल्सने असे असंख्य अडथळे पार केले आहेत. बुधवारी सनरायजर्स हैदराबादला नामोहरम करून ‘क्वालिफायर-२’नामक उपांत्य फेरी गाठण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असेल.

सांघिक पुनर्बांधणी करीत ‘आयपीएल’च्या १२व्या हंगामात दिल्लीने कात टाकली आहे. साखळीतील १४ सामन्यांत नऊ विजयांसह १८ गुण कमावूनही दिल्लीला विजेतेपदाच्या दृष्टीने बाद फेरीतील एक पराभवसुद्धा आव्हान संपुष्टात येण्यासाठी पुरेसा असेल.

दिल्लीपेक्षा तीन विजय कमी मिळवूनही हैदराबादला (१२ गुण) त्यांच्याशी लढावे लागणार आहे. डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो विश्वचषकाच्या तयारीसाठी मायदेशी परतल्यापासून हैदराबादचे धाबे दणाणले आहेत. चेन्नई सुपर किंग्जकडून पत्करलेला मोठा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आहे.

दिल्लीच्या संघाला अद्याप ‘आयपीएल’ची अंतिम फेरी गाठता आलेली नाही. याशिवाय २०१२नंतर प्रथमच हा संघ बाद फेरीपर्यंत पोहोचू शकला आहे. परंतु यंदाची कामगिरी आणि सातत्य पाहता दिल्लीला रोखणे आव्हानात्मक ठरू शकेल.

मुंबई इंडियन्सविरुद्ध वर्चस्वपूर्ण सुरुवातीनंतर दिल्लीने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध शरणागती पत्करली. मग किंग्ज ईलेव्हन पंजाबविरुद्ध त्यांच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करली, तर हैदराबादविरुद्ध गृहमैदानावरील सामना त्यांनी गमावला. या सामन्यानंतर दिल्लीने जोरदार मुसंडी मारत सर्वाचे लक्ष वेधून घेतले.

धवन, श्रेयस, पंतवर दिल्लीची भिस्त

भारताचा सलामीवीर शिखर धवनने एकूण ४५० धावा करीत सातत्य राखले आहे. युवा पृथ्वी शॉसोबत त्याने उत्तम सलामी दिली आहे. कर्णधार श्रेयस अय्यरने (एकूण ४४२ धावा) काही अप्रतिम खेळी साकारून आपल्या परिपक्वतेचे दर्शन घडवले आहे. दिनेश कार्तिकसाठी विश्वचषकाच्या भारतीय संघातून वगळलेल्या ऋषभ पंतनेही जबाबदारीने फलंदाजी केली आहे. रिकी पाँटिंग आणि सौरव गांगुली या क्रिकेटमधील दोन मातब्बर क्रिकेटपटूंचे मार्गदर्शन दिल्लीसाठी सकारात्मक ठरत आहे. दिल्लीला वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडाची उणीव तीव्रतेने भासणार आहे. परंतु तरीही हैदराबादच्या फलंदाजांवर अंकुश ठेवणारे गोलंदाज दिल्लीकडे आहेत.

रशीद, भुवनेश्वर, खलील हैदराबादचे बलस्थान

वॉर्नर आणि बेअरस्टो यांनी हैदराबादच्या विजयी घोडदौडीत महत्त्वाची भूमिका बजावली होती. ते मायदेशी परतल्यानंतर संघाची कामगिरी घसरली. परंतु तरीही १२ गुणांसह बाद फेरी गाठणारा हैदराबाद हा ‘आयपीएल’ इतिहासातील पहिला संघ ठरला आहे. साखळीच्या उत्तरार्धात मनीष पांडेने फलंदाजीत सुधारणा केली आहे. हैदराबादच्या गोलंदाजीची भिस्त रशीद खान, भुवनेश्वर कुमार आणि खलील अहमद यांच्यावर आहे. केन विल्यम्सनसारखा भरवशाचा संघनायक ही हैदराबादची जमेची बाजू आहे. त्याचा न्यूझीलंडचा सहकारी मार्टिन गप्टिलकडूनही दर्जेदार फलंदाजीची अपेक्षा आहे. याचप्रमाणे आगामी विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळवणाऱ्या विजय शंकरला सामन्याच्या सरावाची ही आणखी एक संधी असेल.

संघ

दिल्ली कॅपिटल्स: पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), कॉलिन इन्ग्राम, शेरफान रुदरफोर्ड, किमो पॉल, अक्षर पटेल, अमित मिश्रा, इशांत शर्मा, ट्रेंट बोल्ट.

सनरायजर्स हैदराबाद  : वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक), मार्टिन गप्टिल, मनीष पांडे, केन विल्यम्सन (कर्णधार), विजय शंकर, युसूफ पठाण, मोहम्मद नबी, रशीद खान, भुवनेश्वर कुमार, के. खलील अहमद.

दिल्ली-हैदराबाद यांच्यात ‘आयपीएल’चे १४ सामने झाले असून, यापैकी दिल्लीने नऊ सामन्यांत विजय मिळवला आहे, तर हैदराबादला पाच सामन्यात यश लाभले आहे.

सामन्याची वेळ : सायं. ७.३० वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १