सायना नेहवाल आणि अश्विनी पोनप्पा या भारतीय बॅडमिंटन विश्वाच्या गौरवशाली पर्वाच्या मानबिंदू. या दोन अव्वल खेळाडूंच्या संघांमध्ये इंडियन बॅडमिंटन लीग (आयबीएल)च्या मुंबई टप्प्यातील पहिली लढत होणार आहे. सायना नेहवालच्या हैदराबाद हॉटशॉट्स आणि अश्विनी पोनप्पाच्या पुणे पिस्टन्स या दोन मातब्बर संघांमध्ये सोमवारी मुंबईतील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये मुकाबला रंगणार आहे.
हैदराबादची आयकॉन खेळाडू असलेल्या सायनाने दोन्ही लढतीत दिमाखदार विजय मिळवला आहे. गुआंगझाऊ (चीन) येथे नुकत्याच झालेल्या विश्व अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई करणाऱ्या पी.व्ही. सिंधूला सरळ गेम्समध्ये चीतपट करत सायनाने आपले वर्चस्व सिद्ध केले होते. दुसऱ्या लढतीत नागपूरकर अरुंधती पानतावणेचा सायनाने धुव्वा उडवला होता. पहिल्या सामन्यात हैदराबादने लखनौच्या अवध वॉरियर्सवर मात केली होती, मात्र शनिवारी क्रिश दिल्ली स्मॅशर्सकडून त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.  
दुसरीकडे निखिल कानेटकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या पुण्याने दोन्ही लढतीत विजय मिळवत शानदार सुरुवात केली आहे. पहिल्या लढतीत क्रिश दिल्ली स्मॅशर्ससारख्या मातब्बर संघाला धूळ चारली होती तर शनिवारी झालेल्या चुरशीच्या लढतीत त्यांनी मुंबई मास्टर्स संघावर विजय मिळवला होता. दोन्ही सामन्यांत विजय मिळाल्याने आत्मविश्वास उंचावलेला पुण्याचा संघ हैदराबाद हॉटशॉट्सवर विजय मिळवत विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी सज्ज झाला आहे. अश्विनी पोनप्पाने मिश्र दुहेरीच्या लढतीत विजय मिळवत दोन्ही सामन्यांत पुण्याच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली आहे.
हैदराबादसाठी सायना नेहवालचा जबरदस्त फॉर्म जमेची बाजू आहे. मात्र पुरुष एकेरीतील दोन्ही लढतीत त्यांच्या हाती निराशाच पडली आहे. अवध वॉरियर्सविरुद्धच्या लढतीत अजय जयराम तर दिल्लीविरुद्धच्या लढतीत माजी विश्वविजेता तौफिक हिदायतला पराभवाला सामोरे जावे लागले होते. अजयच्या जागी तौफिकला संघात समाविष्ट करण्याचा निर्णय हैदराबादला यश मिळवून देऊ शकलेला नाही. पुण्याविरुद्धच्या सामन्यात ते मुंबईकर अजय जयरामला घरच्या मैदानावर खेळण्याची संधी देतात का तौफिकच्या अनुभवाला प्राधान्य देतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मिश्र दुहेरीत प्रज्ञा गद्रे आणि व्ही. शेम जोडी तर पुरुष दुहेरीत शेम आणि तरुण कोना पराभूत झाले होते. त्या पाश्र्वभूमीवर शेमच्या जागी राखीव खेळाडूंपैकी एकाला संधी मिळू शकते. तॅनओनग्स्क हा पुरुष एकेरीत हैदराबादसाठी आधारस्तंभ आहे. पुण्याविरुद्ध त्याच्याकडून दमदार खेळाची हैदराबादला अपेक्षा आहे.
पुण्याच्या संघाचा विचार केल्यास अव्वल खेळाडू ज्युलियन शेंककडून विजयी योगदानाची आशा आहे. मुंबई मास्टर्सविरुद्धच्या सामन्यात ज्युलियनने अनुभवी टायने बूनवर मात केली होती. पुरुष एकेरीत न्गुयेन तिन मिन्हने मुंबईच्या मार्क झ्वाइब्लरला नमवले होते. त्याने हा फॉर्म कायम राखल्यास पुणे पिस्टन्स विजयी आगेकूच करू शकतो. रुपेश कुमार आणि सनावे थॉमस या अनुभवी जोडीकडून पुण्याला मोठय़ा अपेक्षा आहेत. मुंबईविरुद्धच्या लढतीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. हैदराबादविरुद्धही त्यांच्यासमोर खडतर आव्हान असणार आहे. युवा सौरभ वर्मा मुंबईच्या व्लादिमीर इव्हानोव्हच्या झंझावातासमोर निष्प्रभ ठरला होता. या सामन्यात झालेल्या चुका टाळत पुनरागमन करण्याची सौरभला संधी आहे. मिश्र दुहेरीत अश्विनी पोनप्पा-जो. फिश्चर जोडी पुण्यासाठी भाग्यदायी आहे. मुंबईविरुद्धच्या लढतीत मुकाबला २-२ बरोबरीत असताना याच जोडीने संयमी खेळ करत पुण्याला शानदार विजय मिळवून दिला होता. या जोडीला रोखणे हैदराबाद हॉटशॉट्ससमोरचे मोठे आव्हान असणार आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सायनाला टक्कर देणाऱ्या खेळाडूंमध्ये ज्युलियन शेंकचे नाव अग्रणी आहे. आयबीएलच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय स्तरावरील जागतिक क्रमवारीत अव्वल दहामध्ये असणाऱ्या खेळाडूंमध्ये जोरदार मुकाबला रंगणार आहे.
वेळ : रात्री ८ वाजता
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स-२ आणि ईएसपीएन