बेंगळूरुवर ४-३ असा विजय

अखेरच्या सामन्यापर्यंत रंगलेल्या प्रीमिअर बॅडमिंटन लीगचे जेतेपद अखेर यजमान हैदराबाद हंटर्सने आपल्या नावावर केले. अंतिम फेरीत हैदराबादने बेंगळूरु ब्लास्टर्सवर ४-३ असा विजय मिळवला.  चार सामन्यांनंतर दोन्ही संघांचे ३-३ असे समान गुण झाले होते, पण निकराच्या झुंजीत हैदराबादने बाजी मारली.

पहिल्या पुरुष एकेरीच्या सामन्यात बेंगळूरुच्या बोए मॅथिअस आणि किम सार रँग यांनी हैदरबादच्या मार्किस किडो आणि यू येऑन सेआँग यांच्यावर १५-९, १५-१० असा सहज विजय मिळवला. हैदराबादने हुकमाचा सामना म्हणून पुरुष एकेरीची निवड केली आणि आपल्यावरील विश्वास साथ ठरवत ली ह्यून इलने बेंगळूरुच्या शुभंकर डेवर १५-७, १५-१३ असा विजय मिळवला.

बेंगळूरुने पुरुष एकेरीत  व्हिक्टर अ‍ॅक्सेल्सनला हुकमाच्या सामन्यात खेळवायचे ठरवले.  व्हिक्टरने लौकिकाला साजेसा खेळ करीत बी. साईप्रणीतवर १५-८, १५-१० अशी सहज मात केली.  ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या हैदराबादच्या कॅरोलिन मरीनने बेंगळूरुच्या क्रिस्टी ग्लिमोरवर १५-८, १५-१४ असा विजय मिळवला.  निर्णायक आणि अखेरच्या लढतीत हैदराबादच्या सात्विकसाईराज रानकीरेड्डी व पिआ झेबादिआ बर्नाडेट यांनी बेंगळूरुच्या किम सा रँग व सिक्की रेड्डी यांच्यावर १५-११, १५-१२ असा विजय मिळला.