रांचीत गुरुवारी धावांचा अक्षरश: पाऊस पडला, परंतु सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्जला अनपेक्षित पराभवाचा देत बाद फेरीच्या दृष्टीने आपले आव्हान टिकवून ठेवले आहे. डेव्हिड वॉर्नर आणि शिखर धवन यांनी हैदराबादच्या विजयाचा अध्याय लिहिताना संघाला सहा विकेट आणि दोन चेंडू राखून विजय मिळवून दिला.
चेन्नईच्या अवघड आव्हानाचा सामना करताना वॉर्नर आणि धवन यांनी ११६ धावांची दमदार सलामी दिली, यातील ९० धावा या एकटय़ा वॉर्नरच्या होत्या. त्याने ४५ चेंडूंत १२ चौकार आणि ३ षटकारांनिशी आपली शानदार खेळी साकारली, तर कर्णधारपद डॅरेन सॅमीकडे सोपवल्यानंतर धवनने दडपण झुगारणाऱ्या फलंदाजीचा प्रत्यय घडवला. त्याने ५० चेंडूंत ४ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ६४ धावा केल्या.
त्याआधी, ड्वेन स्मिथ (४७), डेव्हिड हसी (नाबाद ५०) आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी (४१ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ५७ धावा) या त्रिकुटाने फटक्यांची आतषबाजी करीत चेन्नई सुपर किंग्जला ३ बाद १८५ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली.

संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपर किंग्ज : २० षटकांत ३ बाद १८५ (महेंद्रसिंग धोनी नाबाद ५७, डेव्हिड हसी नाबाद ५०; करण शर्मा २/१९) पराभूत वि. सनरायजर्स हैदराबाद : १९.४ षटकांत ४ बाद १८९ (डेव्हिड वॉर्नर ९०, शिखर धवन नाबाद ६४; सुरेश रैना १/१७)
सामनावीर : डेव्हिड वॉर्नर.