पदुकोण अकादमीचे स्पष्टीकरण

हैदराबाद सोडून बेंगळूरुला सरावासाठी स्थायिक होण्याचा निर्णय हा सायना नेहवालचा व्यक्तिगत निर्णय होता, त्यात आमचा कोणताही हस्तक्षेप नव्हता, असे प्रकाश पदुकोण अकादमीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पदुकोण अकादमीने एका पत्रकाद्वारे भारताचे बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे.

गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली सायना नेहवाल खऱ्या अर्थाने नावारूपाला आली. ते पाहता सायनाने २०१४च्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेनंतर हैदराबाद येथील गोपीचंद यांची अकादमी सोडून बेंगळूरुला जेव्हा विमल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करण्याचा निर्णय घेतला तेव्हा अनेकांना धक्का बसला. यावरून गोपीचंद यांनी आपल्या ‘ड्रिम्स ऑफ ए बिलियन’ या आगामी पुस्तकात माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांच्यावर निशाणा साधला आहे.

पदुकोण, विमल कुमार आणि ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्टचे पदाधिकारी विरेन रस्किन्हा यांनी सायनाला हैदराबाद सोडण्यासाठी प्रोत्साहन दिले, असा आरोप गोपीचंद यांनी या पुस्तकात केला आहे.

पदुकोण अकादमीने मात्र गोपीचंद यांच्या आरोपांचे खंडन केले आहे. ‘‘हैदराबादहून बेंगळूरु येथील प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमीत सराव करण्यासाठी येण्याचा निर्णय हा सर्वस्वी सायनाचा आहे. उलट विमल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सायना जागतिक क्रमवारीत अग्रस्थान प्राप्त करू शकली,’’ असे पदुकोण अकादमीने स्पष्ट केले आहे.