चम्पियन्स करंडक स्पर्धेदरम्यान सर्वत्र क्रिकेटचा फिवर दिसून आला. क्रिकेट हा इंग्लंडचा खेळ असला तरी सध्याच्या घडीला आशिया खंडात या खेळाचा बोलबाला दिसून येतोय. भारत, पाकिस्तान आणि श्रीलंकेसोबत या खेळात आता बांगलादेशही रंगला आहे. क्रिकेटच्या मैदानात या संघाने चमत्कारी खेळी करत अनेकदा आपले अस्तित्त्व दाखवून दिले. यंदाच्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत पहिल्यांदा उपांत्यफेरी गाठून त्यांनी क्रिकेटच्या मैदानात आपली ताकद दाखवून दिली. अर्थात क्रिकेटच्या फिवरमध्ये बांगलादेश रंगत असल्याचे चित्र असताना बांगलादेशच्या कर्णधाराने क्रिकेटरपेक्षा लोकांना जीवनदान देणारा डॉक्टर ही महत्त्वपूर्ण व्यक्ती असल्याचे म्हटले आहे. क्रिकेटर्संना टाळ्यांनी दाद देण्यापेक्षा डॉक्टरांच्या कामाला दाद द्यायला हवी, अशी इच्छा बांगलादेश संघाचा कर्णधार मशरफे मोर्तझा एका पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. मी क्रिकेटर आहे मात्र मी कोणाला जीवनदान देऊ शकत नाही.

एखाद्याला जीवनदान देण्याचे काम फक्त डॉक्टरच करु शकतो. त्यामुळे देशातील चांगल्या डॉक्टरच्या कामाला सलाम करणे गरजेचे आहे. ज्या प्रमाणे क्रिकेटमधील खेळाडूला डोक्यावर घेतात त्याप्रमाणे डॉक्टरांच्या कामाचे कौतुक केले तर त्यांना काम करण्यास आणखी ऊर्जा मिळेल, असे त्याने भावनिक पोस्टमध्ये लिहिले आहे. याशिवाय त्याने मजूर वर्गाला देखील सलाम केला आहे. त्यांच्या कष्टातून राष्ट्राची निर्मिती होते. आम्ही नव्हे तर ते देशाचे खरे हिरो आहेत, असे तो मानतो. आम्ही किंवा एखादा कलाकार हा पैसे घेऊन काम करतो. मात्र जवान देशासाठी शहीद होतो. त्यामुळे त्यांच्यापेक्षा आम्ही महान होऊ शकत नाही. आम्हाला पैसा मिळतो म्हणून आम्ही चेंडूचा सामना करतो. मैदानात खेळणे ही शूरता नाही, असा उल्लेखही त्याने पोस्टमध्ये केलाय. याशिवाय त्याने क्रिकेटच्या मैदानातील चाहत्यांच्या उतावळेपणावर देखील अप्रत्यक्षरित्या खंत व्यक्त केली. क्रिकेटशी देशभक्ती जोडणाऱ्यांना कोणती व्याख्या द्यावी, हे मला न उमगणारे कोडे असल्याचे तो म्हणाला आहे.