भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक हे काही वर्षांपूर्वी आपल्या विवाहामुळे चर्चेत आले होते. अनेकदा सोशल मीडियावर दोन्ही खेळाडूंना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. लग्नानंतर शोएब आणि सानिया यांनी UAE मध्ये घर विकत घेत तिकडे रहायला सुरुवात केली. मुलाच्या जन्मानंतर सानियाने टेनिसच्या मैदानात पदार्पण करत दुहेरीचं विजेतेपदही पटकावलं. गेल्या काही महिन्यांपासून लॉकडाउनच्या काळात सानिया आपल्या हैदराबाद येथील घरात आपला मुलगा व आई-बाबांसोबत राहत आहे. तर पाकिस्तान सुपर लिगसाठी आपल्या मायदेशी परतलेला शोएब राहत्या घरी अडकून पडला आहे. इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पाक क्रिकेट बोर्डाने शोएबला सानियाची भेट घेण्याची परवानगी दिली आहे.

एका पाकिस्तानी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत शोएबने सानिया मिर्झासोबत लग्न आणि भारत-पाकमधील तणावाच्या संबंधांवर भाष्य केलं आहे. “सानियाशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मी कोणत्याही पद्धतीने तणावात नव्हतो. तुमचा जोडीदार कोणत्या देशाचा आहे, राजकीय परिस्थिती काय आहे याची तुम्हाला चिंता नसते. तुम्ही त्या व्यक्तीवर प्रेम करताय का आणि तुम्हाला त्याच्याशी लग्न करायचं आहे का इतकाच मुद्दा महत्वाचा असतो. मग तुम्ही कोणत्याही देशाचे का असेना…तसं बघायला गेल्यास माझे अनेक मित्र भारतीय आहेत, आम्ही बोलताना कधीही दोन देशांमधले तणावाचे राजकीय संबंध मध्ये येत नाही. कारण मी खेळाडू आहे, राजकारणी नाही.” शोएबने आपली बाजू स्पष्ट केली.

२८ जूनरोजी पाकिस्तानी संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. वन-डे आणि कसोटीमधून शोएबने निवृत्ती स्विकारली असली तरीही टी-२० क्रिकेटमध्ये तो अजुन खेळतो आहे.