‘भारतात क्रिकेट म्हणजे धर्म आणि सचिन तेंडुलकर हा देव’ हे अविरत, अतूट, चिरतरुण असे समीकरण आहे. त्याचे रूप पाहण्यासाठी, त्याची प्रत्येक धाव पाहण्यासाठी कोटय़वधी भक्तांचे डोळे आसुसलेले असतात. आतापर्यंतच्या देदीप्यमान कामगिरीच्या जोरावर चाहत्यांच्या मनातला तो ताईत झाला आहे, अनेकांच्या मनाच्या देव्हाऱ्यात त्याच्याच तसबिरी आहेत, देवत्व त्याला आपसूकच मनापासून या भक्तांनी बहाल केलेले आहे. पण असे असले तरी दस्तुरखुद्द सचिनला मात्र आपण देव असल्याचे वाटत नाही. ‘‘मी क्रिकेटचा देव नाही, देवाकडून चुका होत नाहीत, पण माझ्याकडून बऱ्याच चुका झाल्या आहेत,’’ असे सचिनने सांगितले.
सचिनने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर फलंदाजीचे जवळपास सर्वच विक्रम पादाक्रांत केले आहेत. त्याच्याशी स्पर्धा करणारा एकही क्रिकेटपटू सध्या दिसत नाही. लहान असताना सचिनला सुनील गावस्कर आणि व्हिव रिचर्डस व्हायचे होते, असे त्याने सांगितले.
जेव्हा मी लहान होतो तेव्हा मला गावस्करांसारखे व्हायचे होते. पण जसा मी मोठा होत गेलो तसा मी देशाबाहेरचे खेळाडूही पाहायला लागलो. त्यामध्ये व्हिव रिचर्डस यांच्या फलंदाजी शैलीला मी भुललो. मला त्यानंतर या दोघांसारखे व्हायला पाहिजे, हे मला वारंवार वाटायचे, असे सचिन म्हणाला.
एकदिवसीय क्रिकेटमधला सर्वकालीन सर्वोत्तम फलंदाज, असे सचिनचे वर्णन करता येईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांची सेंच्युरी रचणार तो एकमेव विश्वविक्रमवीर. याबद्दल विचारले असता तो म्हणाला की, जेव्हा आशिया चषकात मी शंभरावे शतक झळकावले तेव्हा मी उडय़ा मारल्या नाहीत, तो क्षण साजरा केला नाही. मी देवाला पहिला प्रश्न विचारला की, मी काय चूक केली, ही गोष्ट घडायला एवढा वेळ का लावलास, मी नेमका कुठे कमी पडलो? अब्जावधी चाहते या गोष्टीकडे डोळे लावून बसले होते, त्यांना किती वेळ वाट बघायला लावलीस?
तो पुढे म्हणाला की, मी या गोष्टीसाठी अथक मेहनत घेत होतो, कुठलीही कसर बाकी ठेवली नव्हती. विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मी शतकाच्या जवळ पोहोचलोही होतो, पण त्या वेळी शतकावर नव्हे तर विश्वचषकावर लक्ष केंद्रित केले होते. त्यानंतर मात्र पदरी बऱ्याच वेळा निराशाच पडली. पण ‘देर आए दुरुस्त आए’ असे आपण म्हणू शकतो.
क्रिकेटपटू झाला नसतास तर कोण झाला असतास, असे विचारल्यावर सचिन म्हणाला की, माझ्यापुढे जास्त पर्याय उपलब्ध नव्हते. मी अभ्यासाबरोबर क्रिकेटही खेळायचो, दोन्ही गोष्टींमध्ये योग्य समन्वय असावा, असे मला वाटायचे, पण तसे घडले नाही. क्रिकेटमुळे मला रात्रभर झोप लागायची नाही. क्रिकेटबद्दल अतीव प्रेम आणि आदर माझ्या मनात होता.
तो पुढे म्हणाला की, एकदा इमारतीच्या गच्चीवर मी एका हातात टेनिस रॅकेट आणि दुसऱ्या हातात क्रिकेटची बॅट घेऊन गेलो होतो. पहिले २० मिनिटे मी टेनिस खेळलो आणि नंतरची २० मिनिटे क्रिकेट. माझे टेनिसवरही अपार प्रेम आहे आणि त्याचा मी आनंद लुटतो. क्रिकेटशिवाय मी आयुष्याचा विचारच करू शकत नाही. तसेच काहीसे टेनिसच्या बाबतीतही आहे.
आतापर्यंतच्या क्रिकेटच्या प्रवासाबद्दल तो म्हणाला की, भारतीय संघात खेळणे हे माझे सर्वात मोठे ध्येय होते आणि ते पूर्णही झाले. भारतीय संघाचे टी-शर्ट आणि टोपी घातल्यावर जी भावना मनात येते, ती शब्दांत व्यक्त करता येणार नाही. माझा आतापर्यंतचा क्रिकेटचा प्रवास अद्भुत असाच आहे. जेव्हा मी पहिल्या कसोटी सामन्यात खेळून ड्रेसिंग रूममध्ये आलो तेव्हा मी रडायला लागलो होतो. ही माझी अखेरची कसोटी असेल, असे मला त्या वेळी वाटले होते. पण संघातील वरिष्ठ खेळाडूंनी माझी समजूत घातली. त्यानंतर वकारचा उसळता चेंडू मला लागला होता, त्यानंतरही मी अजून खेळत आहे, हे एक आश्चर्य आहे.