भारत हा भावनाप्रधान देश आहे, असे म्हटले जाते. कारण भारतात सर्वात जास्त महत्त्व आहे ते प्रेम, भावना यांना. त्यामुळेच इथे प्रत्येकाला आपुलकीने वागवले जाते. जर तो परदेशी असला तर त्याचा पाहुणचार अगदी आपल्या पाहुण्यांसारखा केला जातो. ‘अतिथी देवो भव’चा अनुभव आल्यावर तो गहिवरून गेला. क्रिकेटपटू असूनही जेवढे मायदेशात प्रेम नाही मिळाले, तेवढे भारतात मिळाल्याचे सांगताना आंद्रे रसेल हरवून गेला. ‘‘आयपीएलसाठी मी भारतात आलो आणि सुखद अनुभव मिळाला. भारतीयांनी जेवढे प्रेम, मान, सन्मान दिला, तेवढे आम्हाला मायदेशातही मिळाले नाही,’’ असे आंद्रे रसेल सांगत होता.
‘‘भारतवासी आम्हाला एखाद्या सेलिब्रेटीसारखी वागणूक देतात. अशी वागणूक आम्हाला मायदेशातही मिळत नाही. भारतातील लोक ज्या पद्धतीने माझ्याशी वागत आहेत, ते मी तुमच्यापुढे शब्दांत मांडू शकत नाही,’’ असे २४ वर्षीय दिल्ली डेअरडेव्हिल्सचा अष्टपैलू रसेल बोलत होता. नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात रसेल बोलत होता. यावेळी इरफान पठाण, आशिष नेहरा, व्हॅन डर मव्‍‌र्ह, शाहबाज नदीम आणि प्रशिक्षक एरिक सिमन्स उपस्थित होते.