सुवर्णपदकाच्या समीप येऊनही हे पदक स्नूकरपटू आदित्य मेहताला हुलकावणी देत असे. मात्र नुकत्याच कोलंबियामधील काली शहरात झालेल्या वर्ल्ड गेम्समध्ये आदित्यने सुवर्णपदकाचा मान आपल्या शिरपेचात खोवला. कांस्यपासून सुवर्णपदकापर्यंतचे स्थित्यंतर अत्यंत सुखावणारे असल्याची भावना आदित्यने व्यक्त केली.
‘‘सध्या मी प्रचंड आनंदात आहे. कोलंबियाची सफर माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण ठरला. सर्वोत्तम पाच लढती आणि बाद फेऱ्या यामुळे स्पर्धेचे स्वरूप फसवे होते. टेबलाशी संबंधित गोष्टीही आम्ही नेहमी खेळतो, त्यापेक्षा वेगळ्या होत्या. या सर्व गोष्टींशी मी एवढय़ा सहजतेने कसे जुळवून घेतले, याचे मलाही आश्चर्य वाटते आहे. मूलभूत गोष्टी अचूक करण्यावर मी भर दिला,’’ असे त्याने पुढे सांगितले.
भारतीय स्नूकरविश्वाचा ध्रुवतारा ठरलेल्या आदित्यला आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये मात्र सुवर्णपदक हुलकावणी देत असे. मात्र २७ वर्षीय मुंबईकर आदित्यने हे दुष्टचक्र भेदत कोलंबियातील ऑलिम्पिकखालोखाल प्रतिष्ठेच्या समजल्या जागतिक क्रीडा स्पध्रेमध्ये सुवर्णपदकावर नाव कोरले.
‘‘हा खूप मोठा प्रवास आहे. माझी संपूर्ण कारकीर्द संथ आणि कूर्मगतीसाठी ओळखली जाते. या प्रवासादरम्यान मी खूप काही शिकलो आहे. कांस्य, रौप्यपदकांचे सुवर्णपदकांमध्ये रुपांतर करता येणे, हे आत्मविश्वासाचे लक्षण आहे. या पदकाने मला खूप आनंद झाला आहे’’, असे आदित्य यावेळी म्हणाला.
‘‘उपांत्यपूर्व फेरीत १-२ अशा पिछाडीवरून तसेच चौथ्या फ्रेममध्ये ५० गुणांनी मागे असतानाही मी विजय मिळवला. या विजयाने प्रचंड आत्मविश्वास मिळाला. हा क्षण माझ्या कारकीर्दीतील सर्वोत्तम क्षण आहे. जागतिक स्नूकर विश्वात भारताचा झेंडा रोवता आला याचा अभिमान आहे,’’ असे त्याने सांगितले.
‘‘अंतिम लढतीत माझा खेळ बऱ्याच सामन्यांनंतर चांगला झाला. अंतिम लढतीत सुरक्षात्मक खेळ करायचा की आक्रमक, हा माझ्यापुढे पेच होता. मात्र मी जोरदार आक्रमण केले आणि हेच कदाचित माझ्या विजयाचे गमक ठरले,’’ असे आदित्यने सांगितले.
जागतिक क्रीडा स्पध्रेमध्ये सुवर्णपदक पटकावणारा आदित्य केवळ दुसरा भारतीय क्रीडापटू ठरला. याआधी बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनी १९८२मध्ये सुवर्णपदकावर कब्जा केला होता.
‘‘या पदकाने उर्वरित हंगामासाठी प्रेरणा मिळाली आहे. गेल्या हंगामात माझी कामगिरी चांगली झाली नव्हती. पण मी मेहनत करत होतो. मला विजय मिळवता येत नव्हते, मात्र माझ्या खेळात बदल घडत होता. सर्वोत्तम कामगिरीसाठी एकाग्र होणे फार आवश्यक आहे. व्यावसायिक स्नूकरविश्व आव्हानात्मक आहे. मी काही ध्येय निश्चित केली आहेत, त्यानुसार वाटचाल करणार आहे,’’ असा विश्वास त्याने प्रकट केला.